महाराष्ट्र

CM Medical Help Cell : शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे यांना हटविले

Devendra Fadnavis : रामेश्वर नाईक यांची नियुक्ती; जाताना भावनिक पोस्ट

Administrative Change : राज्यातील लाखो गरीब रुग्णांसाठी नवसंजीवनी देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी कार्यरत असलेल्या मंगेश चिवटे यांना बदलण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर रामेश्वर नाईक यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यापूर्वीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे विश्वासू होते. नवीन नियुक्तीनंतर रामेश्वर नाईक यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर मंगेश चिवटे यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

या पोस्टमध्ये मंगेश चिवटे यांनी पदभार सोडल्यानंतर कार्यालयाच्या पायऱ्यांवर डोकं टेकत नमस्कार केल्याचा फोटोही टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुख पदी काम करताना एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. राज्यभरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उद्देशून हे पत्र मंगेश चिवटे यांनी पोस्ट केले आहे. राज्यामध्ये निवडणुकीनंतरही महायुतीचे सरकार असले तरी मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे सत्ताबदल होताच प्रशासकीय रचनेतही बदल केले जात आहेत.

अनेक ठिकाणी फेरबदल

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी बरेच प्रशासकीय फेरबदल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयामध्ये उपसचिव म्हणून कामाचा अनुभव असलेल्या श्रीकर परदेशी यांना त्यांनी सोबत घेतले आहे. परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या विभागांमध्ये देखील फेरबदलाला आता सुरुवात झाली आहे. श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातही बदल करण्यात आला आहे.

https://www.facebook.com/share/p/1M7vSqKxFD/

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेत. त्यावेळी त्यांनी मंगेश चिवटे यांची नियुक्ती या कक्षाच्या प्रमुख पदी केली होती. नेहमीप्रमाणे सरकारमध्ये बदल झाल्यानंतर अधिकाऱ्यांची बदली ही अटळ असते. सर्वच मंत्री आपापल्या सोयीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून घेतात. या अधिकाऱ्यांची असलेले ‘ट्युनिंग’ काम करताना प्रभावी ठरते, असा युक्तिवाद या बदल्यांमागे केला जातो. मात्र आधीच्या सरकारमधील मंत्र्यांशी अधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. त्यामुळे ते नव्या मंत्र्यांना सहकार्य करतीलच, याबद्दल संशय असतो. त्यामुळे सरकार बदलताच अधिकाऱ्यांची बदली देखील केली जाते.

महाराष्ट्रही अपवाद नाही 

सत्ता बदलल्यानंतर यासाठी या रचनेत बदलांच्या बाबतीत महाराष्ट्र देखील अपवाद राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील प्रशासकीय रचनेत बरेच बदल केले होते. याशिवाय महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांनी आपापल्या सोयीचे अधिकारी देखील नेमून घेतले होते. महायुतीचा सरकार सत्तेवर आल्यानंतर हा प्रशासकीय फेरबदल पुन्हा एकदा बघायला मिळाला. आता ‘देवेंद्र राज’ आल्यानंतरही हे बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे अधिकारी देखील ‘परिवर्तन संसार का नियम है’ या सूत्राप्रमाणे नवीन जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!