Political NEWS . मुंबईतील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांचीच नाही, तर समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे. रोहिंग्यांमुळे वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे. एवढेच नाही तर त्यांनी यावेळी मतदान देखील केले, असा गंभीर आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती देखील केली आहे.
मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या राहत असल्याचा आरोप वारंवार केला जातो, यावर आता मंगल प्रभात लोढा यांनी देखील कठोर भूमिका घेतल्याने कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाला विनंती
मंगल प्रभात लोढा म्हणाले ‘माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की, त्यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीची पुन्हा तपासणी करावी आणि त्यामधील रोहिंग्या किंवा बांग्लादेशी नागरिकांची नावे काढून टाकावी. एटीएस अतिशय चांगल्या रितीने त्यांची धरपकड करत आहे आणि त्यांना परत पाठवत आहे. आम्ही मुंबई उपनगरात यासाठी एक विशेष टीम सुद्धा गठीत केलेली आहे. जोपर्यंत रोहिंग्या बांग्लादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार देखील त्यांनी केला.
अनधिकृतरित्या कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकांच्या हक्काच्या सुविधा घुसखोरांना मिळत असल्याने आज कठोर कायद्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री या बाबतीत सजग असून, त्यावर योग्य कार्यवाही होईल असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. भारतीय जनता पार्टीद्वारे वसंत स्मृती येथे आयोजित केलेल्या प्रादेशिक बैठकीनंतर मंत्री लोढा बोलत होते.
यापूर्वी देखील मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत राज्य सरकारने पाऊल उचलले होते. मालाड-मालवणी परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांची माहिती मिळवण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. आता पुन्हा त्यांनी बांगलादेशी-रोहिंग्या यांच्या बाबत कठोर भूमिका घेतल्याने पुढील कारवाईकडे लक्ष असेल.