मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात आशीष जयस्वाल यांची रामटेकची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी चांगलेच संतापले. त्यांनी शुक्रवारी (18 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मी गडकरींचा समर्थक असल्याने मला डाववललं’ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
मल्लिकार्जून रेड्डी यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी थेट पंगा घेतला होता. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी त्यांची तातडीची पत्रकार परिषदही होणार होती. पण ऐनवेळी रद्द करण्यात आली. दरम्यान, रामटेकमध्ये भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी घेतला. त्यात शेकडोंनी राजीनामे दिले. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस आणि बावनकुळेंवर गंभीर आरोप केले आहेत.
‘गडकरींचे समर्थक असलेल्या नेत्यांना संपविण्याचे काम सुरू आहे. गिरीश व्यास आणि अनिल सोलेदेखील गडकरींचे समर्थक आहेत. त्यांचेही राजकारण संपविण्यात आले. त्यामुळेच आज दोघेही सक्रीय राजकारणात नाहीत. आता मलाही लक्ष्य करण्यात आले आहे. मी गडकरींचा समर्थक असल्यामुळे मलाही रामटेकमधून डावलण्यात आले आहे. आणखी काही नेते आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,’ असं रेड्डी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
काही गोष्टी बोलू शकणार नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. त्याबद्दल मी उघडपणे बोलू शकणार नाही. माझ्यावरील कारवाई मात्र गडकरींचा समर्थक असल्यामुळेच झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात असाच प्रकार सुरू आहे, असा आरोपही रेड्डी यांनी केला आहे.
आणखी राजीनामे येतील
आशीष जयस्वाल यांनी बंडखोरी केली होती. आता त्यांना पक्षात घेऊन शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. पण एकनिष्ठ भाजपच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. रामटेकमध्ये भाजपचाच उमेदवार असावा आणि राज्यात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, एवढीच इच्छा व्यक्त केली होती. माझं काय चुकलं?, असा सवाल रेड्डी यांनी केला. भाजपमधून आणखी बरेच राजीनामे लवकरच येतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
निवडणूक लढणार की नाही?
भाजपला तिकीट नाकारल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. पण एवढे करून मल्लिकार्जून रेड्डी निवडणूक लढणार की नाही, याबबात अनिश्चितता आहे. पत्रकार परिषदेत देखील त्यांनी विचार करूनच निर्णय घेणार असं म्हटलं आहे.