Political war : भाजपमधील मुरलेल्या नेत्यांना जी गोष्ट खासगीत बोलतानाही भीती वाटते ती माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी भर पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. त्यामुळे केवळ नागपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, बहुधा देशातच या विधानाची चर्चा होऊ लागली आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नेते मंडळी हातचं राखून बोलतात. टीका करायची असेल तर ती विरोधी पक्षातील नेत्यांवर करतात. पण रेड्डी यांनी गडकरींच्या नावाचा उल्लेख करून फडणवीस आणि बावनकुळेंवर हल्ला चढवला आणि सर्वांचं लक्ष वेधलं. त्यामुळे भाजपमध्ये आपण गडकरींचे समर्थक आहोत म्हणून दुर्लक्षित राहिलो, अशी भावना असलेले नेते ‘रेड्डीजी आपने ये क्या कह दिया?’ असं म्हणत इमोशनल झाले आहेत.
मल्लिकार्जून रेड्डी यांची राजकीय कारकिर्द गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून सुरू झाली. बाहेरून आलेल्या माणसाला तुलनेत फार लवकर स्वीकारण्यात आले. ते या पक्षावर सुरुवातीला निवडणूकही लढले. चांगली मतं मिळाली. अर्थात यश मिळण्यासाठी त्यांना भाजपमध्ये यावं लागलं आणि मोदी लाटेची वाट बघावी लागली. 2014 मध्ये मोदी लाट आणि आशीष जयस्वाल यांच्या विरोधातील वातावरण यामुळे रेड्डी विजयी झाले, असे म्हटले जाते. पण त्यांची पाच वर्षांची कारकिर्दही तशी वादग्रस्तच राहिली. त्याचा परिणाम 2019 मध्ये दिसला. रामटेककरांनी पुन्हा जयस्वाल यांच्या गळ्यात माळ घातली.
टीकास्त्र
या संपूर्ण कालावधीत रेड्डी यांचे पक्षातील नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी उत्तम संबंध निर्माण झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तर चांगलेच संबंध होते. किमान वरवर तरी असेच दिसत होते. पण यंदा रामटेकची उमेदवारी नाकारताच त्यांनी टीकास्त्र उगारले. त्यांचा निशाणा थेट फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे होता. ‘जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा फडणवीस, बावनकुळे झोपले होते का?’ असा सवाल त्यांनी केला. त्यासाठी त्यांचं पक्षातून निलंबन झालं.
या कारवाईनंतर ठरवलेली पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली. एक दिवस विचार केला. मेळावा घेतला आणि खळबळ उडवून देणारं विधान घेऊन मैदानात उतरले. ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समर्थक असल्यामुळे फडणवीस आणि बावनकुळे यांनी माझं तिकीट डावललं’, असा थेट हल्ला चढवला. गडकरी आणि फडणवीस यांच्यात मतभेद आहेत, असंही ते म्हणाले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास गडकरींचे समर्थक असल्याने त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणले, असा आरोपही केला.
चर्चा पे चर्चा
मुळात गडकरींच्या माणसांना मोदी-शाह किंवा फडणवीस डावलत असतात, ही चर्चा होत असते. तसं अनेक राजकीय पुढारी खासगीत बोलतातही. पण रेड्डी यांनी उघडपणे त्यासंदर्भात भाष्य केल्यामुळे हा विषय चव्हाट्यावर आला. त्यामुळे जरा मागे डोकावून बघणे भाग पडले आहे. 2020 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी निश्चित झाली होती. ऐनवेळी फडणविसांचे खास संदीप जोशी यांचे नाव पुढे आले. त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्याहीवेळी गडकरींनी सोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. पण फडणविसांनी परस्पर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली, असे आरोप झाले होते. त्या निवडणुकीनंतर अनिल सोले सक्रीय राजकारणातून बाहेर आहेत.
गिरीश व्यास हे भाजपचे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी. त्यांच्या वडिलांपासून म्हणजे पं. बच्छराज व्यास यांच्यापासून लिगसी चालत आली आहे. निष्ठेने पक्षाचं, संघटनेचं काम करणं, यावर त्यांनी भर दिला. 2016 मध्ये त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यापूर्वी अनेकदा संधी हुकली होती. पण 2022 मध्ये त्यांची टर्म संपली आणि सक्रीय राजकारणातही ते अपवादानेच आढळतात. विदर्भातील आणखीही अनेक भाजपचे नेते आहेत, ज्यांना गडकरींचे समर्थक म्हणून त्रास सहन करावा लागला. नागपूर जिल्ह्यातही आता अनेकांवर गदा येणार आहे, असा दावा रेड्डी यांनी केला आहे.
बावनकुळेंनाच नको रेड्डी?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशीष जयस्वाल यांची खास मैत्री आहे. पक्षाच्या पलीकडे दोघांमध्ये गेल्या काही वर्षांत उत्तम संबंध निर्माण झालेत. जयस्वाल आणि रेड्डी यांच्यात अनेक वर्षांपासून वैर आहे. त्यामुळे बावनकुळेंनी रामटेक मतदारसंघात लक्ष घालणं अत्यंत स्वाभाविक आहे. जयस्वाल यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा रेड्डी यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले असावेत, असे बोलले जात आहे.