Mallikarjun Reddy : रामटेक विधानसभा मतदारसंघात आशीष जयस्वाल यांना शिंदे गटाच्या अधिकृत यादीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कार्यक्रमात तोंडी घोषणा केली होती. त्यावरूनच भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी गोंधळ घातला. पण आता प्रत्यक्ष यादीत जयस्वाल यांचं नाव आलं आहे. त्यामुळे पुढे ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाला समर्थन
रामटेकमध्ये आशिष जयस्वाल अपक्ष आमदार आहेत. त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले होते. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे रामटेकमधून यंदा शिवसेनेच्या चिन्हावरचा उमेदवार असणार आहे. मुळात यादी जाहीर होईपर्यंत अनिश्चितता नसती तर या जागेचा विषय एवढा गाजला नसता. मात्र आचारसंहिता लागण्याच्या दोन दिवस आधी शिंदेंनी रामटेकमधील एका कार्यक्रमात आशीष जयस्वाल महायुतीचे उमेदवार असतील, असे घोषित केले. त्यावर रेड्डी यांनी आक्षेप घेतला.
जयस्वाल यांनी युती धर्म पाळला नाही. बंडखोरी केली. तरीही त्यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी फडणवीस बावनकुळे झोपले होते का?, असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाची शिस्त मोडल्यामुळे सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पुढेही ते थांबले नाहीत. त्यांनी गडकरी समर्थक आहोत, म्हणून आपल्याला डावलण्यात येत असल्याचा गंभीर आरोप फडणवीस आणि बावनकुळेंवर केला.
फडणवीस यांची चर्चा
या संपूर्ण वादानंतर फडणवीस यांनी रामटेकमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांची समजूत काढली आणि महायुतीसोबत कायम राहण्याचे आवाहन केले. पण, मल्लिकार्जून रेड्डी यांच्या निलंबनामुळे शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. अशात प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून जयस्वाल यांना आव्हान देण्याची रेड्डींची तयारी आहे, असंही बोललं जात आहे. तर बाहेर राहून जयस्वाल यांचं गणीत बिघडवण्याची तयारी सुरू आहे, असंही काहींचं म्हणणं आहे.
जयस्वाल यांची आव्हानं वाढली
आशिष जयस्वाल यांच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान तर रेड्डी यांनी उभे केले आहे. ते रिंगणात उतरल्यास मतं विभागले जातील. अन्यथा महाविकास आघाडी, प्रहार जनशक्ती, अपक्ष आदींचे आव्हान त्यांच्यापुढे आहेच. त्यातही महाविकास आघाडीने रामटेकची जागा शिवसेनेला (ठाकरे गट) दिली तर शिवसेनेच्या पारंपरिक मतांचे विभाजन निश्चित आहे.