Mahayuti meeting : महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी सध्या आपले लक्ष ‘लाडकी बहीण’ व ‘लाडका भाऊ’ या योजनांवर केंद्रित केले आहे. या योजनांचा व्यापक प्रचार करण्यासाठी गावोगावी सभा घेतल्या जात आहेत. तर रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून ‘व्होट बँक’ कशी वाढविता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बहिण-भाऊ महायुतीला लाडकं मानतात का, हे बघण्याची उत्सुकता असेल.
मध्यप्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. मध्यप्रदेशमध्ये भाजपची सत्ता येण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली. हाच आदर्श डोळ्यापुढे ठेऊन महायुती सरकारने (महायुती) लाडकी बहीण, लाड़का भाऊ योजना आणल्या.
या योजनेचा व्यापक प्रचार करण्यासाठी गावोगावी सभा घेतल्या जात आहेत. तर रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातही स्थानिक पातळीवर याचा प्रचार केला जात आहे. लोकप्रतिनिधींचे कार्यालय या योजनेचा लाभ मिळवून देण्यास सजली आहेत. महायुतीचे आजी-माजी आमदार तर आपल्या विधानसभा मतदार संघात या योजनचे अर्ज केले गेले की नाही याची पूर्ण माहिती ठेवत आहेत. त्यामुळे मतदाराला ही योजना किती आकर्षित करेल हे लवकरच कळणार आहे.
गोंदियात महायुती-आघाडीत चढाओढ
विधानसभा निवडणुकीची वेळ जवळ येत असल्याने प्रमुख पक्षांतील इच्छुक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा देखील उफाळून आल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चारही ठिकाणी दावा ठोकल्याने विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. जागा एक अन् इच्छुक अनेक असे चित्र असल्याने उमेदवारी ठरविताना पक्ष श्रेष्ठींचा चांगलाच कस लागणार हे मात्र निश्चित आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही; पण सुरुवातीपासूनच दबाव वाढविण्यासाठी प्रबळ दावेदारी केली जात आहे.तर वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती, बसप यांच्यासह काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांच्या भूमिकेकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी होते की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाते याकडे लक्ष लागले आहे.