महाराष्ट्र

Yavatmal Politics : उमरखेड, आर्णीमध्ये महायुतीकडून उमेदवार बदलाचे संकेत

Assembly Election : एका मतदारसंघात नावावर एक मत, दुसऱ्यात उमेदवार ठरेना

Mahayuti : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये एकमत झाले आहे. संजय राठोड, मदन येरावार, अशोक उईके आणि इंद्रनील नाईक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. अशात उमरखेड आणि आर्णी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार बदलाचे संकेत आहेत. आर्णी विधानसभा मतदारसंघाचा चंद्रपूरच्या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. या मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेसला किती मतं मिळाली ही आकडेवारी जगजाहीर आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय करायचं याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

उमरखेड मतदारसंघामध्ये भाजपचे नामदेव ससाणे हे आमदार आहेत. त्यांच्या जागी जुन्या उमेदवाराचे नाव आता आघाडीवर आले आहे. मतदारसंघांच्या रचनेनुसार, उमरखेड मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका आणि महागांव तालुक्यातील गुंज,महागांव व मोरथ यांचा समावेश आहे. उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो. उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. आता या मतदारसंघात माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे नाव सर्वात आघाडीवर आले आहे. रविवारी (20 ऑक्टोबर) नागपुरातील वरिष्ठ भाजप नेत्यांमध्ये माजी आमदार नजरधने यांचे नाव चर्चेत आले.

आर्णीबद्दल शोध 

आर्णी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्याबद्दल सध्या पक्ष नेतृत्व डोलायमान परिस्थितीत आहे. धुर्वे हे सध्या मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी तयारी करत आहेत. परंतु त्यांच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी ठाम नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल याबद्दल भाजप प्रदेश कार्यकारणीतील नेतेही ठामपणे सांगायला तयार नाहीत. आर्णी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी घाटंजी ही दोन तालुके येतात.

Chandrapur Congress : धानोरकरांना काँग्रेस कार्यकर्त्यांचा विसर, कार्यकर्त्यांनी धरली भाजपाची कास !

केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, पांढरकवडा देखील या मतदारसंघात आहे. पांढरकवडा नगरपालिका क्षेत्रातही याच मतदारसंघात समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघांमधून राजू तोडसाम यांना भाजपने संधी दिली होती. अनेक वर्षांपर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. या मतदारसंघातून शिवाजीराव मोघे हे आमदार होते. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रिपदही देण्यात आले होते. यंदा आर्णी मतदारसंघातून शिवाजीराव मोघे यांनी आपल्या मुलासाठी शब्द टाकला होता. त्यानुसार काँग्रेसने जितेंद्र मोघे यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. तसे संकेतही मोघे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मोघे यांच्याकडून तयारीला सुरुवात झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यवतमाळ जिल्ह्यातून झालेल्या मतदानाची गोळा बेरीज नेत्यांनी केली आहे. उमरखेड आणि आर्णी या दोन्ही मतदारसंघातून भाजपला मिळालेल्या मतांचा विचारच दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे नाव फायनल करताना होणार आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भात भारतीय जनता पार्टी निर्णय जाहीर करेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रदेश स्तरावरील नेत्यांनी दिलेल्या संकेतांचा विचार केला तर सध्या तरी उमरखेड आणि आर्णी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बदलले जाण्याचे चित्र आहे. मात्र अखेरच्या क्षणी या नेत्यांवर कोणाची मेहेरनजर झाल्यास, चित्र बदलू शकते असंही सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!