Maratha & OBC Reservation : महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाचे ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाचे आपले आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. तर ‘आरक्षण बचाव’चा नारा देऊन प्रकाश आंबेडकर ओबीसींच्या पाठिशी उभे झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर दररोज राजकीय पुढाऱ्यांची वेगवेगळी विधानं चर्चेत येत आहेत. त्यात माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाजपच्या ज्या मोठ्या नेत्यांना फटका बसला त्यात रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत. जरांगे यांनी मराठवाड्यातून आंदोलन सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होणार हे निश्चित दिसत होते. मात्र तरीही पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागेल, याचा कुणीही विचार केला नव्हता.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा राजकीय पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या कल्याण काळेंनी त्यांंना पराभूत केले. दानवेंचा हा पराभव मराठा समाजाच्या आंदोलनाचा मोठा इम्पॅक्ट मानला गेला. ज्या आरक्षणाच्या मुद्याने रावसाहेब दानवेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणले त्याच मुद्यावर त्यांनी मोठे विधान केले आहे.
‘राज्यातील महायुती सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहे. पण विरोधकांनी ही बाब मान्य असल्याचे आपल्या जाहीरनाम्यात आधी स्पष्ट करावे,’ असे आव्हान दानवेंनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी विरोधकांनी देखील आमचे सरकार आले तर जरांगेंच्या म्हणण्यानुसार आरक्षण देऊ, असे जाहीर करावे, असेही आव्हान दानवे यांनी दिले.
ज्यांना जास्त मतं पडली त्यांनी
लोकसभा निवडणुकीत आपण घवघवीत यश मिळवलं, असं शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीला वाटत असावं. तसं असेल तर त्यांनी आपल्याला जास्त मतं पडल्याचं रिटर्न गिफ्ट जनतेला द्यावं. जरांगे पाटील यांची मागणी आम्हाला मान्य आहे. आपण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत, असं त्यांनी जाहीरनाम्यातून स्पष्टपणे सांगावं, असं आव्हानही दानवे यांनी विरोधकांना दिलं आहे.
जरांगे यांच्यावर टीका
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महायुती सरकार कायम सकारात्मक राहिलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आरक्षण देण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. पण त्यापेक्षा जास्त आरक्षण हवं असल्याचं जरांगे म्हणत आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. पण त्यांचं समाधानच होत नसेल तर महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे जाऊन त्यांची मागणी मान्य करावी. आणि जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख करावा, असे दानवे यांनी म्हटले आहे.