Stay Down To Earth : देशात ‘न भुतो न भविष्यती’ असा इतिहास 2014 मध्ये घडला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणुकीपूर्वीच अख्ख्या देशानं पंतप्रधान म्हणून स्वीकारलं होतं. त्यामुळं स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात विक्रमी बहुमत असलेलं सरकारी स्थापन झालं. 2019 मध्येही जनता जनार्दनानं ‘फिर एक बार मोदी सरकार’ला कौल दिला. दोनदा मिळालेल्या या यशानंतर मात्र भाजप हवेत तरंगू लागली. भाजपच्या अनेक नेत्यांनी तळागाळातील कार्यकर्ते आणि मतदारांना गृहित धरणं सुरू केलं. बुथपातळीपर्यंत जी पकड भाजपनं मिळवली होती, ती अगदीच सैल झाली.
अविकास
अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये विकासाची कामंच केली नाहीत. जनसंपर्क कमी केला. त्याचा फटका भाजपला 2024 मधील लोकसभा निवडणुकीत बसला. काँग्रेसला आयते विरोधी पक्षनेतेपद लोकसभेत मिळालं. यातून भाजपनं चांगलाच धडा घेतला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत भाजपनं ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. परिणामी लोकांनी त्यांना निवडलं. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं म्हणून भाजप खचली नाही. अगदी तसंच आता विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं म्हणून त्यांना हुरळून जाता येणार नाही.
काळजी गरजेची
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कमी होत चाललेल्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. लोकसंख्येचा असमतोल झाला की, समस्या वाढणारच. दुसऱ्या धर्माची लोकसंख्या वाढली म्हणून आपलीही लोकसंख्या वाढविणे हा काही उपाय असू शकत नाही. कोणत्याही देशातील लोकसंख्या वाढत गेली की, समस्यांमध्ये भर पडत जाते. त्यामुळं वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंदा केंद्र आणि राज्य सरकारला कठोर पावलं उचलावी लागणार आहे. असं झालं तर वारंवार ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देण्याची गरजच भासणार नाही.
समाज कोणताही असो, त्याला विकास हवा असतो. तरुणाईच्या हाताला काम हवं असतं. धार्मिक मुद्द्यांवर चेतविलेल्या भावना साबणाच्या फेसावर आलेल्या बुडबुड्यांसारख्या असतात. कालांतराने हे बुडबुडे फुटतात. भूक लागली की माणासाला अन्नच लागते. अन्न खरेदी करण्यासाठी पैसाच लागतो. हा पैसा आणण्यासाठी रोजगारच लागतो. ही बाब आता प्रकर्षानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला लक्षात घ्यावी लागणार आहे. मूलभूत विकासासह रोजगार निर्मितीही गरजेची राहणार आहे. उर्वरित समस्यांवर मात करण्यासाठी सरकार धर्मांतर बंदी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा असे उपाय करता येतील. धार्मिक कट्टरवादाला रोखण्यासाठी पावले उचलता येतील. पण त्या एकाच गोष्टीची री फार काळ ओढता येणार नाही, हे आता केंद्र अन् राज्य सरकारला विसरता येणार नाही.
पब्लिक सब जानती है
केवळ एक लाडकी बहीण योजना आणली म्हणून महायुती विजयी झाली, असं म्हणता येणार नाही. लाडक्या बहिणींना मिळालेले दीड हजार रुपयेही ‘गेमचेंजर’ ठरले यात शंका नाही. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात जर विरोधी पक्षातील सरकार दिले, तर राज्याला काही मिळणार नाही, हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं होतं. विशेषत: अशा गोष्टींचा तरुणाई खूप गंभीरतेने विचार करीत असते. तरुणाईच्या या विचारांचा मोठा फायदा यंदाच्या निवडणुकीत झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केवळ जहरी टीका झाल्या. त्या अनेकांना आवडल्या नाही. महाविकास आघाडीतील एकही नेता विकास या विषयावर बोलत नव्हता. निवडणूक जिंकलो तर राज्याचा कसा विकास करणार? याचं ‘ब्लू प्रिंट’ कोणाकडेही नव्हतं. त्यामुळं ‘पब्लिक सब जानती है’ याचा विसर आघाडीला पडला.
लोकसभा निवडणुकीपर्यंत ज्या चुका भाजप आणि मित्रपक्षांनी केल्या, त्या सगळ्या सुधारल्या. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं ताकदीनं तयारी केली. बुथपातळीवरील विस्कटलेली कार्यकर्त्यांची घडी पुन्हा बसवली. पण काही मतदारसंघांमध्ये जनतेच्या मनाविरुद्ध उमेदवार देणंही भाजपला महागात पडलं. त्यामुळं अशा मतदारसंघात अखेरच्या क्षणापर्यंत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नव्हता. अखेरच्या क्षणी काय तो प्रचार झाला. असा हट्टीपणा भाजपला थोडा कमी करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावतीत आणि विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिममध्ये हे प्रामुख्यानं दिसलं.
हुशारी
जनता मुर्ख नसते. मतदार खुपच हुशार असतात. ते बोलत नसतात. प्रत्येक गोष्ट ते बारकाईनं टिपत असतात. निवडणूक आली की, ते योग्य निर्णय घेतात. कोणी कितीही सर्वेक्षण केलं, तरी कोणत्या व्यक्तीनं ईव्हीएमवरचं कोणतं बटन दाबलं हे कोणीही सांगू शकत नसते. परिणामी बरेचदा सगळे सर्वेक्षण फेल ठरतात. सगळं काही आपल्यालाच मिळावं अशी काहींची हाव असते. हे काय माझंच, ते ही काय माझंच अशी महत्वाकांक्षा काही नेत्यांची असते. त्यातून मतभेद निर्माण होतात. नेत्यांमध्येही राजकारण खेळलं जातं. एकमेकांना संपविण्यासाठी षडयंत्र रचले जातात. यापासूनही भाजपला दूर राहावे लागणार आहे. सर्वांना सोबत घेऊन चौफेर विकास करावा लागणार आहे. असं करण्यासाठी निसर्गाचा एक नियम सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, उगवता सूर्य कधी ना कधी अस्ताला जातोच. यासाठी ती कव्वाली आठवावी, ज्यात गायक म्हणतो ‘याद कर सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनियासे दोनों हात खाली है.’