रावेर आणि जळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आपला ‘गड’ अभेद ठेवण्यात यश आले आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. तर जळगावमधून स्मिता वाघ यांनी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) करण पाटील यांच्यावर विजय प्राप्त करून, महायुतीने महाविकास आघाडीला दोन्ही मतदारसंघांमधून पराभूत केले आहे.
बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील काही भाग मिळून तयार झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय संपादित केला आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांची ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. मराठा समाजाचा उमेदवार असाच त्यांचा प्रचार करण्यात आला. मात्र त्याचा उलट परिणाम झाल्याचे दिसून आले.
खडसेंना फायदा
रावेर मतदार संघात लेवा पाटील आणि लेवा गुजर समाज यानिमित्ताने एकत्र आले आणि त्याचा मोठा फायदा रक्षा खडसे यांना झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि प्रचारातही रक्षा खडसे यांना काही ठिकाणी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परंतू, खडसे यांनी संयमाची भूमिका घेत नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे करीत प्रचाराची रणनीती बदलवली आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत गेला.
ठाकरे, शरद पवार गटाला केले पराभूत
भाजपने जळगाव जिल्ह्याचा ‘गड’ कायम ठेवला आहे. जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजपने आपली विजयाची परंपरा सलग चौथ्यांदा कायम ठेवली आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे करण पाटील यांचा तब्बल 2,51,396 मतांनी पराभव केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी हॅट्ट्रिक साधत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा 2,72,183 मतांनी पराभव केला. रक्षा खडसे यांना 6,30,879 तर स्मिता वाघ यांना 6,74,026 मते मिळाली.
Buldhana Constituency : अडचणीत आले नाही प्रतापराव, कारण मदतीला आले जामोद अन् खामगाव
2019 मधील मताधिक्ये
2019 सालच्या निवडणुकीत भाजपाच्या रक्षा खडसे यांना 6,55,386 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना 3,19,504 मते मिळाली होती. रक्षा खडसे यांचे त्यावेळेचे मताधिक्य 3,35,882 एवढे होते.
सट्टा बाजाराचा अंदाज तंतोतंत
जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, सट्टा बाजारात बुकींनी या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनाच पसंती दिली होती. यासह विविध संस्थांमार्फत करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्येदेखील जळगाव व रावेर या दोन्ही जागांवर भाजपचा विजय होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला. रक्षा खडसे यांच्या विजयाच्या दाव्यावर २५ पैसे हा दर सुरुवातीपासून होता, तर श्रीराम पाटील यांच्या विजयाच्या दाव्यावर एक रुपया ते दीड रुपया एवढा दर होता. शेवटी सट्टा बाजाराचा कल निकालाअंतीदेखील कायम राहिला.