विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार हे निश्चित आहे. अशात बंडखोरी रोखण्यासाठी काही पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही महायुतीने आपले उमेदवार निश्चित केले आहे. सातपैकी सहा मतदारसंघांवर शिक्कामोर्तब झालेले आहे. एका मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सावध झाली आहे. त्यातल्या त्यात भाजप तर अधिकच सावध झाला आहे. विदर्भातील आपल्या जागांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच शाहांच्या मर्जीतील केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निवडणूक व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, चिखली या मतदारसंघांत भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या तिन्ही जागांवर भाजपाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची पकड आहे. महायुतीतून गायकवाड यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर होणार, हे निश्चित आहे. शिंदे गटाला मेहकरच्या माध्यमातून दुसरी जागा मिळणार आहे. आमदार संजय रायमुलकर हे या ठिकाणी विजयाचा चौकार मारतील असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. सिंदखेडराजा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. या ठिकाणी डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार आहेत. शिंगणे निवडणुकीपर्यंत अजित पवारांसोबत थांबले तर येथून त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे.
एकमेव मलकापूर मतदारसंघ राजेश एकडे यांच्या रूपाने काँग्रेसकडे आहे. महायुतीतून पुन्हा एकदा माजी आमदार संचेती यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. किंवा दुसऱ्याला संधी देण्याचाही विचार भाजप श्रेष्ठी करू शकतात.
गडकरींना गळ घातली
महाराष्ट्राचे वातावरण महायुतीला अनुकूल नसल्याचे सर्वेक्षणात पुढे आले. त्यानंतर स्वतः गृहमंत्री अमित शाह सावध झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नसलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय झाला. फडणवीस यांचा चेहरा पुढे करून निवडणूक जिंकणे अशक्य आहे. गडकरीच तारणहार ठरतील. त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी द्यावी, असा आग्रह संघाकडून करण्यात आल्याचे कळते. त्यानंतर एक महिना महाराष्ट्र पिंजून काढण्याची विनंती गडकरींना करण्यात आली.
राष्ट्रपती राजवटीची होऊ लागली चर्चा
निवडणुका लांबणीवर पडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी चर्चा आहे. तर ठरलेल्या वेळेतच म्हणजेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे, असा दावा करणाराही एक वर्ग आहे. त्यामुळे भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात आहे. अमित शाह हे नुकतेच मुंबई दौर्यावर आले. त्यांनीदेखील निवडणुकीचा आढाव घेतला.