या लेखातील मते लेखकाची आहेत, या मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही
Political War : विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रमुख राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगणार आहे. आरोप प्रत्यारोपांच्या बाबतीत ‘चला चला कोण पुढे पळतो ते’ असा खेळ सुरू झाला आहे. मविआने महायुतीला सत्तेतून हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आता तर त्यांनी ‘गद्दारांचा पंचनामा’ ही पुस्तिकाच प्रकाशित केली. या पुस्तिकेत महायुती सरकारच्या कार्यकाळातील कारभाराची चिरफाड करण्यात आली आहे. पुस्तिकेचे प्रकाशन वांद्रे येथील हॉटेल ताजमध्ये झाले.
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सर्वश्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अरविंद सावंत, अनिल देसाई, नाना पटोले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन वाद सुरू होते. या बैठकीत हा वाद मिटला. आधी महायुतीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करु द्या, नंतर आम्ही आमच्या नेत्याचे नाव जाहीर करु असे ठरले. त्यावर एकमत झाले.
महायुती गद्दारांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार आहे काय, हेही त्यांनी जाहीर करायला हवे, असे उध्दव ठाकरे म्हणाले. आम्हाला मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही तर राज्यातील जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शरद पवार, नाना पटोले यांनी घेतली.
मविआतील घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद या बैठकीनंतर झाली. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहे, असे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेवरही नेत्यांनी भाष्य केले. जनतेला परिवर्तन हवे आहे. राज्यातील सर्व व्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे महायुती चे सरकार पाडण्यासाठी मविआने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत, असे यावेळी नेत्यांनी सांगितले.
लोकांना बदल हवाय
राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. मी महाराष्ट्रात सर्वदूर फिरलो. माझे सहकारी सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी केलेल्या निरिक्षणातून जनतेचा कौल दिसून येतो, असे शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी कोणी मान्य करत नव्हते तरीही महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या. याचा अर्थ लोकांना बदल हवा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले.
अनावश्यक महामंडळे
राज्यातील महायुतीच्या कारभारावर शरद पवार यांनी ताशेरे ओढले. महायुती सरकार कोणताही विचार न करता धडाधड निर्णय घेत आहे. किती निर्णयांची अंमलबजावणी होईल हे सांगता येत नाही. विविध महामंडळे स्थापन केली जात आहेत. त्यांची उपयुक्तता नाही. त्यावर होणारा प्रशासकीय खर्चही जास्त आहे हे नियोजन खात्याने सरकारच्या लक्षात आणून दिले. त्याकडे कोणी लक्ष दिलेले नाही. विविध महामंडळ स्थापण्याचा सपाटा सुरूच आहे, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. पूर्वी महाराष्ट्रातील प्रशासनाचा देशात नावलौकिक होता, महायुतीच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उध्वस्त झाली आहे. याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागू शकते असा इशारा त्यांनी दिला.
‘बंजारा समाजाला काँग्रेसनेच न्याय दिला’
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आले होते. तेथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर काही आरोप केले. काँग्रेस ने बंजारा समाजासाठी काहीच केले नाही असे ते म्हणाले. शरद पवार यांनी हा आरोप खोडून काढला. काँग्रेसने बंजारा समाजाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली अशी आठवण पवार यांनी करून दिली. वसंतराव नाईक अकरा वर्षे तर सुधाकरराव नाईक तीन वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणले. बंजारा समाज आजही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो असे ते म्हणाले. पंतप्रधान ही एक संस्था आहे. पण त्याची प्रतिष्ठा राखली जात नाही, असंही ते म्हणाले.
गुलामांची वसाहत
उद्धव ठाकरे हे महायुती आणि त्यांच्या नेत्यांवर बोचरी टीका करण्यास सतत उत्सुक असतात. संधी मिळाली की ते आपलं मन मोकळे करतात. बोलताना ते जरा जास्तच बोचऱ्या आणि खोचक शब्दांचा मनमुरादपणे वापर करतात. यावेळी बोलण्याची संधी त्यांनी सोडली नाही. महाराष्ट्र ही मोदी आणि शाह यांच्या गुलामांची वसाहत झाली आहे. असे तिखे बोल त्यांनी सुनावले. राज्यात सर्वच बाबतीत बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे सरकार घालवावेच लागेल असे ते म्हणाले.
सामान्यांची सुरक्षा धोक्यात
दोन पोलीस महासंचालक असणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. लाडक्यांना पोलीस महासंचालक करा पण राज्यातील कारभाराचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते, सारेच असुरक्षित आहेत. पोलिसांचा वापर गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे.याकडे त्यांनी लक्ष वेधले. सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत याची माहिती माहितीच्या अधिकारातून मिळवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्यात पैशाची नुसती उधळपट्टी सुरू आहे. जाहिरातींवर वारेमाप पैसा खर्च होत आहे. हा पैसा जनतेच्या सुरक्षेसाठी वापरला जाणे आवश्यक आहे असे मत नोंदविले.
अनेक मुद्दे मांडणार..
महायुती च्या कारभार चे वाभाडे काढणारे अनेक मुद्दे आम्ही निवडणूक प्रचारात मांडणार आहोत. या निष्क्रिय , भ्रष्टाचारी सरकारचा भांडाफोड करणार आहोत असे त्यांनी सांगितले. आम्ही या गद्दारांचा पंचनामा, आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडले आहे. जनताच या सर्वांचा न्यायनिवाडा करेल अशी आपल्याला खात्री आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला मोदी शहा यांचा गुलाम होऊ देणार नाही असेही सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे. कोणीही सुरक्षित राहीलेले नाही असे वक्तव्य माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा संदर्भ देत केले. आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाही, तर जनताच आता त्यांना सत्तेतून खाली खेचेल असे भाकीत वर्तवले.
महाविकास आघाडीने ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध केला. आता महायुतीकडून ही त्याला तोडीसतोड उत्तर दिले जाईल. ‘जंग की अभी शुरुवात हुई है’. आरोप प्रत्यारोपांचे ढग आता असेच गर्जत राहणार आहे. अलीकडे राज्यात घडलेल्या काही घटनांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महायुती सध्या तरी त्याचा समर्थपणे सामना करत असल्याचे दिसते.