राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सर्वात जास्त 415 जागा जिंकल्या होत्या. पण, त्यांना अहंकार नव्हता. नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला अन् त्यांना महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगु देसमच्या दोन पायांचा आधार घेऊन भाजपला सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही, तर हुकूमशाह बनून सत्ता नियंत्रीत करायला पाहात आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवला, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, ‘भाजपने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर येथील विरोधी पक्षांची सरकारं तोडफोड करून घालवली. आणि भाजपची सत्ता स्थापन केली. मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले व फुटलेल्या नेत्यांना राज्यसभा बहाल केल्या. पण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चोख उत्तर दिले. जनतेने 240 वरच रोखले. आता विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा.’
राजीव गांधी यांनी विविध आजारांवरील लसीकरण केले. पण कधीच त्यांनी स्वतःचा फोटो लावला नाही. परंतु मोदींनी कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर फोटो लावण्याचे चिल्लर काम केले. भाजप एक विषारी साप आहे, त्याला दूर ठेवा असेही खरगे म्हणाले. राजीव गांधी यांच्या अकाली निधनाने देशाचा मोठा तोटा झाला, असे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
गांधी कुटुंबाचे योगदान
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, मुंबई व काँग्रेस आणि मुंबई व राजीव गांधी यांचं वेगळं नातं आहे. राजीव गांधी यांचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा आहे. त्यांनी देशाला नवी दिशा दिली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना नेहरू-गांधी म्हटले की काय होते माहित नाही. ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्याविषयी आकसाची भूमिका पंतप्रधान व त्यांचे सहकारी घेतात हे चुकीचे आहे. देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाण्याचा ध्यास राजीव गांधी यांनी घेतला होता. देश घडवण्यात नेहरू व गांधी कुटुंबाचे मोठे योगदान आहे. देशाच्या इतिहासातून नेहरु-गांधी कुटुंबाचे योगदान कोणीही पुसू शकणार नाही.
उद्धव ठाकरे यांची टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस पक्ष जास्त दिवस सत्तेत होता. पण शिवसेनेशी कधीच सूडभावनेने वागला नाही. काँग्रेस सरकार असताना शिवसेना नेत्यांच्या घरी कधी ईडी, सीबीआय आली नाही. राजीव गांधी शिवसेनेशी कधीच सुडभावनेने वागले नाहीत. पण भाजप मात्र शिवसेनेला संपवायला निघाला आहे. राजीव गांधी सभ्य व सुसंस्कृत व्यक्ती होते. राजीव गांधी यांनी कोणताही नारा न देता 400 पार केले. एवढे बहुमत असतानाही राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राज आणले. 1994 मध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना, काँग्रेस पक्षाने आंदोलने केली तर त्यांच्यावर लाठी उगारायची नाही, असे स्पष्ट बजावून सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत आता भाजपचा सुपडासाफ करायचा आहे. एकजूट व वज्रमुठ करून देशावरचे संकट दूर करू.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, देशात व राज्यात महाविनाशी सत्ता आहे. कोल्हापूर विशालगड, संभाजीनगरमध्ये जे घडले ते पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावध राहिले पाहिजे. सत्तेसाठी भाजप दंगली घडवू शकते. नाशिकमध्ये परवाच दंगल घडवण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत महाविनाशी सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणावयाचे आहे. सत्तेतील पक्ष एकमेकांचे थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत, उद्या ते एकमेकांचे कपडेही फाडतील.