Badlapur Case : महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातही हा बंद पाळण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अकोल्यात पार पडली. या बैठकीत अकोल्यातही कडकडीत बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेतील वाढ झाली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देश हादरला आहे. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. 24 तारखेला महाविकास आघाडी नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याच प्रकारची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर व बार्शिटाकळी तालुक्यातसुद्धा घडली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे.
नागरिक संतापले
राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सरकार व पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. महिला व मुलींना सुरक्षित वातावरण देण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे राज्यातील व जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करुन या असंवेदनशील सरकारविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली. बंदमध्ये जिल्ह्यातील व्यापारी, शाळा, महाविद्यालय, टॅक्सी युनियन यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये, गाव व शहरांमध्ये शांततेत बंद पाळावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
Vijay Wadettiwar : कोणाला फाशी दिली, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे
बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजहर हुसेन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार नितिन देशमुख, गोपाल दातकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, रफिक सिद्दीकी, यूसुफ अली, राजेश मिश्रा, राहुल कराळे, प्रकाश तायडे, साजिद पठाण, कपिल रावदेव, आनंद वानखडे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.