काँग्रेस पक्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. जनतेने काँग्रेसला मोठा कौल दिला. 2014 आणि 2019 मध्ये राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता. पण 2024 मध्ये 14 खासदार झालेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाप्रमाणेच विधानसभेत देखील कामगिरी करायची आहे. विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या निष्ठावान नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार, असे काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला म्हणाले. विधानसभा निवडणूक तयारीची आढावा बैठक व मराठवाड्यातील खासदारांचा सत्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे 12 ऑगस्ट रोजी संपन्न झाला, त्यावेळी चेन्नीथला बोलत होते.
काय म्हणाले नाना ?
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी 2000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. ती केवळ निवडणूक तोंडावर आहे म्हणून. याच संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ते मोदी-शाह यांचे हस्तक आहेत’ असे म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरील मुख्यमंत्री गुजरातचा हस्तक कसा असू शकतो? महायुती सरकार हे खोकेबाजच आणि धोकेबाज देखील आहे. या लबाडांचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, असे नाना पटोले म्हणाले.
फडणविसांनी भांडणं लावली
2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनगर, मराठा, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले. पण 10 वर्षे सत्ता असतानाही आरक्षण दिले नाही. भाजपा व फडणवीस यांनी जाती जातीमध्ये भांडणे लावली. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावणारे निर्ढावलेले महायुती सरकार आता जाणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरी पांढरी रेष आहे. फडणवीस यांनी निर्माण केलेल्या जातीच्या भांडणात जनतेने पडू नये. मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी तुम्हाला न्याय देतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.
वडेट्टीवारांची तोफ
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, भाजपने लोकसभेला रामाच्या नावाने मते मागतिली. पण जेथे जेथे प्रभूरामाचा पावन स्पर्श झाला. त्या त्या जागी भाजपचा पराभव झाला. महायुती सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. 5 लाख कोटी रुपायांचे टेंडर मंजूर करून त्यातून लुट केली. एक एक उद्योग गुजरातला पळवून नेले. महिंद्राचा 25 हजार कोटी रुपयांचा उद्योग येणार होता, तोही गुजरातला घेऊन गेले. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या खूर्चीवर बसून राज्य गुजरातला गहाण टाकले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
.. आज वो दाग हो गये
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख साहेब आमचे नेते आहेत. काही नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने काही कमी दिलं नव्हतं. लोकांना हे आवडलं नाही म्हणून लोकांनी दाखवून दिलं की ‘कल जो रंग थे आज वो दाग हो गये’, असे अनिल देशमुख म्हणाले.