Mahavikas Aghadi And Mahayuti : महाविकास आघाडीने 85+85-85 असा फॉर्मुला जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. महायुतीने अद्याप जागांचे संख्यानिहाय वाटप जाहीर केले नाही. तरीही तीन्ही मोठ्या पक्षांमध्ये 288 पैकी 278 जागांबाबत एकमत झाले आहे. 10 जागांबाबत अद्यापही भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.
दाट शक्यता
भाजपची दुसरी यादी शुक्रवारी (25 ऑक्टोबर) घोषित होण्याची दाट शक्यता आहे. या दहा जागांबाबत दोन दिवसांनीच तोडगा निघेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली आहे. महायुतीकडून तीन्ही मोठ्या पक्षांनी पहिली यादी घोषित केली. मात्र उर्वरित उमेदवारांची घोषणा कधी होईल, याकडे इच्छुकांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारणा केली असता, भाजपची दुसरी यादी बहुदा शुक्रवारी घोषित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
महायुतीची जागावाटपाची बैठक सकारात्मक झाली आहे. 288 पैकी 278 जागांबाबत एकमत झाले आहे. केवळ 10 जागांवर तोडगा निघायचा आहे. त्या जागांबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. महायुतीचा फॉर्म्युला त्यानंतरच घोषित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित ठरायचे आहे. 85-85-85 मिळून 270 जागा कशा होतात हे समजण्याचा प्रयत्न सुपर कॉम्प्युटर व गणितज्ज्ञ करत आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला.
थेट गडकरींच्या घरी
पहिली यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी फडणवीस आणि बावनकुळे यांनी विमानतळावरून थेट गडकरींचे घर गाठले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिली यादी जाहीर झाली. गुरुवारी सायंकाळी सुद्धा असेच घडले. फडणवीस यांनी विमानतळावरून थेट गडकरींचे घर गाठले. त्यामुळे शुक्रवारी भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
यादीवरच चर्चा
यापूर्वीच्या भेटीत देखील सलग दोन तास गडकरी आणि फडणवीस यांच्यात यादीवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील जागांचा समावेश होता. या बैठकीत देखील चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या तडकाफडकी बैठकीत देखील बावनकुळेंची उपस्थिती होती. मध्य, उत्तर आणि पश्चिम नागपूरचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या जागांवर गुरुवारी चर्चा झाल्याचे कळते.