महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : महायुतीविरोधातील प्रचाराचे मुद्दे ठरले

Assembly Election : काँग्रेस, शिवसेना करणार आक्रमक प्रचार

Maharashtra Politics : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. महायुतीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक प्रचार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट अजितदादांशी दोन हात करणार आहे. अशात प्रचारात कोणते मुद्दे घ्यायचे याचा अजेंडा ठरविण्यात आला आहे. त्यातून महायुतीमधील नेत्यांना व पक्षांना ‘टार्गेट’ करण्यात येणार आहे. यात ‘टॉपटेन’ मुद्दे काँग्रेस आणि शिवसेनेकडून चर्चेला घेण्यात आले आहे.

महाराजांचा पुतळा कोसळला

मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नुकताच कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता. यासंदर्भातील चौकशी अहवाल पुढं आल्यानंतर आता महाविकास आघाडी कागदपत्रांसह मतदारांपुढं जाणार आहे. याशिवाय मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दाही निवडणुकीत गाजणार आहे.

महिला सुरक्षेवर हल्ला

महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून महिला सुरक्षेचा मुद्दा पुढं केला जाणार आहे. बदलापूरसह महाराष्ट्रातील बलात्काराच्या प्रकरणांवर खल होणार आहे. महायुतीमधील कोणत्या नेत्यानं महिलांबाबत अपशब्द काढले, याचं व्हिडीओ फुटेज तयार करण्यात येत आहे. प्रचार काळात त्याचा वापर होणार आहे. राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळविल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. त्याचा लेखाजोखाही मतदारांपुढं मांडण्यात येणार आहे. महायुतीच्या नेत्यांकडून गुंडगिरी, शस्त्र घेऊन धमकाविणे, जमिन बळकाविणे असे आरोप झाले आहेत. त्याचा हिशोबही आघाडी घेणार आहे.

महायुतीकडून अलीकडेच काही नेत्यांना जमिन वाटप करण्याचा आरोप झाला. अशा सर्व जमिन वाटप, अनुदान, कर्जमाफी, वीजबिल माफी, कर बुडवेगिरीचा वापर काँग्रेस आणि शिवसेना प्रचारात करणार आहे. राज्यभरात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. यावरही महाविकास आघाडीचे नेते लोकांमध्ये जाऊन भाष्य करणार आहेत. पोलिस आणि केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर यावरही आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांनी एबी फॉर्म दिला. यावरून आघाडी भाजपला टार्गेट करणार आहे.

Akola West : फडणवीसांचे खास दूत हरीशभाईंकडे

स्थानिक मुद्देही घेणार

राज्यव्यापी मुद्द्यांसोबतच काँग्रेस आणि शिवसेना स्थानिक मुद्द्यांनाही हात घालणार आहे. यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी काही आश्वासनं दिली होती. त्याची पूर्तता आजपर्यंत झाली नसल्याकडंही लक्ष वेधण्यात येणार आहे. केंद्रात आणि राज्यात अनेक एकच सरकार असल्यानं रखडलेल्या प्रकल्पांबाबतही प्रश्न उपस्थित करण्याची तयारी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यात महाविकास आघाडी कितपत यशस्वी होईल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!