Mahavikas Aghadi : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंग रावत यांना सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्वांत मोठे संकट तर भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यारुपाने पुढे उभे ठाकले आहेच. मात्र त्याही पलीकडे त्यांनी स्वतःच आपली इमेज लोकांच्या मनात निर्माण केली आहे. आणि सध्या त्याचाच त्रास त्यांना प्रचार करताना होत आहे. लोकांच्या मनात मात्र ‘काय बोलतात? कसे बोलतात? कसे मत देणार?’ असे प्रश्न आहेत.
बल्लारपूरमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार, राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पूर्वी काँग्रेमध्ये काम केलेल्या आणि बंडखोरी केलेल्या अभिलाषा गावतुरे आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्यात लढत होत आहे.
काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंग रावत सहकार क्षेत्रात काम करतात. जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत. भाजपने या क्षेत्राकडे अद्याप लक्ष घातलेले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेवर काँग्रेसची सत्ता कायम आहे. संतोषसिंग रावत यांच्याबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. त्यांची भाषा चांगली नाही. एकतर मराठी धड बोलता येत नाही आणि त्यातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ते घालून पाडून बोलतात. त्यामुळे बँकेचे जिल्हाभरातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्यावर नाराज आहेत, असे लोक सांगतात.
सुधीर मुनगंटीवार विकासकामांची यादी घेऊन जनतेसमोर जात आहेत. तुलनेत काँग्रेस आणि इतर उमेदवारांकडे सांगायला काहीच नाही. त्यामुळे जातीची समीकरणे बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचं दिसतंय. पण या निवडणुकीत हा मुद्दा चालणार नाही, तर केवळ विकासकामांचाच मुद्दा चालणार आहे, असे मतदार बोलत आहेत. पण ‘भाषा’ हा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचेही लोक बोलत आहेत.
बल्लारपूर मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. गेले तीन टर्म सुधीर मुनगंटीवार येथील आमदार आहेत. आता चौथ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या 15 वर्षांत त्यांनी जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलवून टाकला, असे लोक सांगतात आणि या परिसराचा फेरफटका मारल्यास त्याची प्रचिती येते. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या अपक्ष अभिलाषा गावतुरे यांनीही मतदारसंघात गेल्या वर्षभरात मेहनत घेतली. पण ऐनवेळी काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची मेहनत वाया जाईल, असे आता स्पष्ट दिसत आहे.
रावत यांच्या वागणुकीमुळे
रावत यांच्या वागणुकीमुळे काँग्रेसची काही मते वळून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जातील, असे लोकांचे म्हणणे आहे. रावत यांची लोकांसोबत बोलण्याची भाषा बरोबर नसणे, लोकांना टोचून बोलणे या सवयींमुळे त्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. याचा फायदा थेट सुधीर मुनगंटीवार यांना होणार, असा राजकीय पंडितांचाही अंदाज आहे.