Nagpur : ‘हंगामा’ नावाचा एक सिनेमा २००३ साली आला होता. या सिनेमातील एक प्रसंग आहे. त्यात आफताब शिवदासानी आणि अक्षय खन्ना ‘मै तुझे देख लुंगा’ असे म्हणत एकमेकांपुढे येतात. तो प्रसंग संपेपर्यंत ‘मै तुझे देख लुंगा’ एवढाच संवाद दोघांच्या तोंडी आहे. शेवटपर्यंत ते एकमेकांच्या अंगाला साधा हातही लावत नाहीत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणारे ‘पेन ड्राईव्ह’ प्रकरणही तसेच आहे. हा ‘पेन ड्राईव्ह’ उघडणार की नाही, ती क्लिप खुलणार की नाही, हे सांगता येणार नाही, पण ‘हंगामा’ मात्र आणखी तीन महिने सुरू राहणार, हे नक्की.
२० जुलै २०२४ ला सायंकाळी नागपुरातील चिटणवीस सेंटरमध्ये एक पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव एका व्यासपिठावर होते. त्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी श्याम मानव यांनी ‘प्रतिज्ञापत्र’ प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. ‘महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुखांकडे एक नेत्याने आपला माणूस पाठवला. त्याने देशमुख यांचे त्या नेत्यासोबत बोलणे करून दिले. त्याने चार खोटे आरोप प्रतिज्ञापत्रावर लिहायला सांगितले. तसे केले तर तुमच्या विरोधातील ईडी कारवाई थांबवतो, असे तो नेता देशमुखांना म्हणाला.’ असा हा घटनाक्रम पहिले श्याम मानव यांनी महाराष्ट्राला सांगितला.
दबावाला बळी पडलो नाही
त्यानंतर अनिल देशमुख यांनी तो नेता म्हणजे तत्कालिन विरोधीपक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा खुलासा केला.’ महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी फडणविसांचा माझ्यावर दबाव होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यावर आरोप करणारा मजकुर प्रतिज्ञापत्रात लिहायचा होता. पण मी तसे केले नाही. फडणविसांच्या दबावाला बळी पडलो नाही,’ असे देशमुख म्हणतात. त्यावर संतापलेले देवेंद्र फडणवीस ‘माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे, त्यामध्ये तुमच्या ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स आहेत. व्हायरल करू का?’ असा इशारा देतात. त्यानंतर देशमुखांनी देखील आपला ‘पेन ड्राईव्ह’ माध्यमांना दाखवला. त्यात काय आहे किंवा खरेच काही आहे का, हा नंतरचा विषय.
महाराष्ट्राचे राजकारण किती गमतीदार आहे बघा. दोघांकडेही एकमेकांच्या विरोधात पुरावे होते आणि आजही आहेत, असा दावा केला जातोय. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचे पद संकटात येते. त्यांच्यावर एका प्रकरणात गंभीर आरोप होतात. अश्या परिस्थितीत ज्याचे सरकार महाराष्ट्रात नाही असा विरोधीपक्षनेता आपला माणूस पाठवून देशमुखांवर दबाव आणतात. आणि देशमुख तेव्हा गप्प बसतात. कारण काय?
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या विरोधातील पुरावे आहेत. एका ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमध्ये हे पुरावे आहेत, असा त्यांचा दावा आहे. दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत 400 पार जायचे असताना त्या क्लिप त्यांनी व्हायरल का नाही केल्या? त्यात असे काय आहे की, ज्याचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीतच होणार आहे?
दोन्ही बाजूंनी निशाणा
दोघेही एवढे दिवस गप्प बसतात. उदार मनाने एकमेकांचा विचार करतात. कशाला उगाच आरोप करायचे. कशाला त्रास द्यायचा, असा विचार दोघांनी केला असावा. फडणविसांना वाटले असेल ‘आपण आलोय ना पुन्हा सत्तेत, मग कशाला आता जुने विषय उकरून काढायचे.’ आणि देशमुखांना वाटले असेल ‘आपण तुरुंगातून जामिनावर का होईना बाहेर पडलोय ना, मग कशाला नसते उपद्व्याप करायचे.’ पुढाऱ्यांची दरियादिली आपल्याला इतर कोणत्याच राज्यात बघायला मिळणार नाही, हे महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, तरुणांनी ध्यानात ठेवायला हवे. ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरीही इथे मनभेद नाहीत’, या राजकीय संवादाला साजेशी कृती दोघांकडून होते, हे किती अभिमानास्पद आहे.
पण अचानक एक दिवस अराजकीय ‘मानव’ यात मध्ये पडतं. ही दरियादिली सर्वसामान्यांच्या उपयोगाची नाही, याची जाणीव त्या मानवाला होते. वर्ल्डकप संपलाय, पाऊस तर रोजचाच झालाय, फार काही चांगल्या वेबसिरीज पण एवढ्यात आल्या नाहीत. त्यामुळे आता समस्त महाराष्ट्रजनांना दमदार मनोरंजनाची नितांत गरज आहे, याची जाणीव त्या मानवाला होते. आणि मग सुरू होतो प्रतिज्ञापत्र, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप आणि पेन ड्राईव्हचा खेळ. आता उभा महाराष्ट्र सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत या वेब सिरीजचा एक एक एपिसोड आरामात बघत आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये ‘तो’ पेन ड्राईव्ह उघडेल आणि ‘ती’ क्लिप बघायला मिळेल, असे भोळ्या प्रेक्षकांना वाटत आहे. दुर्दैवाने असे होणार नाही. कारण हा पहिला सिझन आहे. दुसरा सिझन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सुरू होईल.
*(ता.क. : ‘पेन ड्राईव्ह’ किंवा ‘ऑडिओ-व्हिडिओ क्लिप’मध्ये राजकीय ‘प्रकरणं’ देखील असतात, याची महाराष्ट्रातील समस्त वेबसिरीजग्रस्त युवा-मध्यमवयीन-वृद्धांनी नोंद घ्यावी.)*