Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. आजच (15 ऑक्टोबर) आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशातच राजकीय पक्षांत जागावाटप, उमेदवार, मतदारसंघांचे दौरे, सभा, पक्षांतर या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात मनसेला धक्का मोठा धक्का बसला आहे.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीसाठी तयारी करत असतानाच मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच पक्षांना लागले. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील निवडणुकीवर ‘फोकस’ केला आहे. मनसे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. परंतु मनसेला बुलढाण्यात विठ्ठल लोखंडकर यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. लोखंडकर यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात मोठ्या राजकीय उलथापालथी बघायला मिळत आहे. लोखंडकर यांनी काल सोमवारी (14 ऑक्टोबर) सायंकाळी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात बळ मिळाल्याचे चित्र आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी लोकसभेतदेखील मतदारसंघाचा आढावा घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नेते, कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. परंतु मनसेत आक्रमक आंदोलन करणारे विठ्ठल लोखंडकार यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. तर जिल्ह्यात मुकुल वासनिक यांनी पक्षाला बळ मिळवून दिले आहे.