MNS : चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी पद भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करण्याचे नियोजन खूप आधी केले होते. मान्यता मिळण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून अग्रीम रक्कम घेण्यात आली होती. मधल्या काळात या भरतीवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले, तक्रारी होऊ लागल्या. त्यानंतर प्रत्येक पदाचा भाव 5 लाख रुपयांनी वाढला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केला.
राजू कुकडे यांनी ‘द लोकहित’ला या भ्रष्टाचारातील काही गंभीर गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, साधारणतः एक ते दीड महिन्यांपूर्वी शीपाईपदाचा भाव 25 लाख रुपये आणि क्लार्क पदासाठी ३० लाख रुपये होता. दरम्यानच्या काळात या भरती संदर्भात अनेक तक्रारी झाल्या. लोकसभा आणि विधानसभेत अनुक्रमे तत्कालिन खासदार दिवंगत बाळू धानोरकर आणि तत्कालिन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तक्रारी केल्या. आम्हीही भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उघडकीस आणले. पण यामुळे रावत अँड कंपनी अजिबात घाबरली नाही. तर त्यांनी पदांचे भाव पाच लाख रुपयांनी वाढवले.
शिपाई पदाचा भाव वाढून 30 लाख तर क्लर्कचा 35 लाख रुपये केला. या भरतीसाठी संबंधितांकडून काही आगाऊ रक्कम घेण्यात आली. अध्यक्ष आणि संचालकच गॅरंटी घेत असल्यामुळे लोकांनी पैसे दिले. पण ही संपूर्ण भरतीच नियमबाह्य आणि वादग्रस्त आहे. आता तर बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे संतोषसिंग रावत यांचा भ्रष्टाचारी कारभार उघड झाला आहे. रावत यांनी बॅंकेत बोगस कामे केल्याचा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यासह राकेश गावतुरे यांनीही केला आहे.
कोण आहेत रविंद्र शिंदे ?
रविंद्र शिंदे संतोषसिंग रावत यांचे सहकारी आहेत. शिंदे गेल्या 20 वर्षांपासून सहकार क्षेत्रात आहेत. रावत हे मुळात व्यापारी, ठेकेदार आहेत. शिंदेंनी रावत यांना सर्व तांत्रिक बाबींमध्ये मदत केल्याचा राजू कुकडे यांचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय रावत एकटे एवढा मोठा भ्रष्टाचार करणे शक्य नाही, असेही कुकडे यांनी ‘द लोकहित’ला सांगितले. आता रविंद्र शिंदे यांची मैत्री रावत यांना अडचणीत आणणारी ठरली आहे.