Chandrapur : चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या पदभरतीला आता स्थगिती देण्यात आली आहे. हे प्रकरण यापूर्वी चांगलेच गाजले होते. तत्कालिन खासदार बाळू धानोरकर यांनी संसदेत तर त्यांच्या पत्नी भद्रावती-वरोऱ्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधिमंडळ सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. संतोष रावत यांनी धानोरकरांना कडवा विरोध केला होता. त्याच काळात मुलमध्ये रावत यांच्यावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला होता.
अशी झाली चर्चा..
रावतांवरील गोळीबारानंतर प्रकरण चांगलेच तापले होते. गोळीबार कुणी केला, हे तेव्हा उघड झाले नसले तरी यामागे जिल्हा बॅंकेचे राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा आजही आहे. रावत यांनी एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण बॅंकेतून संपवण्याचा घाट घातला होता. याचसाठी त्यांच्याबद्दलचा रोष वाढला होता. धानोरकर दाम्पत्याने पदभरतीवर स्थगिती आणण्यासाठी तेव्हा आटोकाट प्रयत्न केले. पण हे लोकांच्या हितासाठी नव्हते, तर धानोरकरांना आपल्या लोकांची भरती करायची होती. त्यांनाही भ्रष्टाचारच करायचा होता, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केलेला आहे.
2022मध्ये रावत अॅंड कंपनीने भरती प्रक्रियेसाठी मंजुरी मिळवली होती. तेव्हा धानोरकर दाम्पत्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या मंजुरीचा विरोध केला होता. ईडी चौकशीची मागणी करत प्रतिभा धानोरकर यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते. तेव्हा मोठा घोटाळा त्यांना उघड केला होता. त्यानंतर शासनाने या भरतीवर स्थगिती आणली होती. त्यानंतर शासनाच्या विरोधात संतोष रावत अॅंड कंपनी उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यानच्याच काळात रावत यांच्यावर गोळीबार झाला. यामागे जिल्हा बॅंकेचे राजकारण असल्याचे सांगितले जाते.
Chandrapur District Bank : संतोष रावत यांचा कारनामा काँग्रेसला घेऊन बुडणार
अर्ध्या जागांच्या भारतीचे मागितले होते अधिकार
संतोष रावत व संचालक मंडळाने टिसीएस कंपनीला 50 टक्के जागांवर भरती करू देण्याचे अधिकार मागितले होते. पण टीसीएसने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर संचालक मंडळ दुसऱ्या कंपनीच्या शोधात लागले. दरम्यानच्या काळात ‘टिसीएस’सोबत पत्रव्यवहार करण्याचे ढोंग रचण्यात आले. या काळात आयटीआय कंपनीचा शोध घेऊन त्यांना भरती प्रक्रिया राबवण्याचे अधिकार देण्यात आले. आणि ‘आयटीआय’सोबत हातमिळवणी करून संतोष रावत आणि संचालक मंडळाने भरतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचाही आरोप राजू कुकडे यांनी केला आहे.