महाराष्ट्र

Raj Thackeray : अकोल्यात मनसेला येतील का ‘अच्छे दिन’?

Akola : राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह!

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी मनसैनिकांकडून राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केले जात आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे रविवारी (ता. 25) अकोला दौऱ्यावर आहेत. अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे येणार असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. 

दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मनसेची ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला ‘अच्छे दिन’ येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षदेखील मैदानात उतरला आहे. मनसे राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत.

राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा नुकताच आटोपला. दरम्यान आता त्यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. राज ठाकरे हे प्रत्यक्ष मैदानात उतरून पदाधिकारी आणि निरीक्षकांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी चाचपणी करत आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे राज ठाकरे या दौऱ्या दरम्यान काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा करताना दिसत आहेत.

मनसेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात मनसे कार्यरत आहे. सुरुवातीला महापालिकेतही मनसेचा सभापती, नगरसेवक निवडून आले. मनसेचा आणि राज ठाकरेंचा चाहतावर्ग गावागावांत आहे. शहरातही मनसे सक्रिय आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन केली जातात. सध्या सत्तेच्या रुळावर मनसेचे इंजिन धावत नसले तरी येणाऱ्या दिवसांत मनसेला नवसंजीवनी मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.

मिटकरी विरुद्ध मनसे सामना..

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांचा सुपरीबाज असा उल्लेख केला होता. त्यानंतर मनसेचे अकोला निरीक्षक कर्णबाळा दूनबळे यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत स्थानिक विश्रामगृह येथे आमदार अमोल मिटकरींची गाडी फोडली होती.

हे प्रकरण राज्यभर गाजले. आमदार मिटकरी विरुद्ध मनसे असा सामना त्यावेळी रंगला. मिटकरींनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेले मनसेचे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करीत जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.

या प्रकरणानंतर आता राज ठाकरे यांचा अकोला दौरा आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली जात आहे. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

Vijay Wadettiwar : सत्तेचा मलिदा खाण्यात सरकार खुश

या दौऱ्यामुळे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे दौऱ्यात उमेदवार ठरत असल्याने मनसेतील इच्छुकांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा जागांवर सक्षम आणि त्या भागात ताकद असलेला उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या अकोला दौऱ्यामुळे मनसेला अच्छे दिन येतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!