Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यानंतर राज्यभरात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. विदर्भातही त्यांचा जवळपास तीन दिवस मुक्काम होता. पूर्व आणि पश्चिम विदर्भातही त्यांनी चाचपणी केली होती. त्यानुसार मनसेच्या यादीत नागपूर दक्षिण आणि हिंगणा मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. आता प्रस्थापितांच्या आव्हानाला पुढे जात राज ठाकरेंचे सैनिक कशी टक्कर देणार, हे वेळच सांगणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले. हिंगणा येथून विजयराम किनकर आणि नागपूर दक्षिणमधून आदित्य दुरुगकर लढणार आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. हिंगणा येथे समीर मेघे तर नागपूर दक्षिणमध्ये मोहन मते नेतृत्व करीत आहेत. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. विशेषतः दक्षिणसाठी तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे गट) वाद सुरू होते. आता तो वाद जवळपास संपण्यात जमा झालेला आहे.
मात्र, अद्याप दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट नाही. शिवाय ठाकरे गटाला दक्षिण मिळाले नाही म्हणून प्रमोद मानमोडे अपक्ष लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजप, काँग्रेस, बंडखोर आणि अपक्षांच्या गर्दीत मनसेचे उमेदवार आदित्य दुरुगकर यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. त्यांना मतदारांना आकर्षित करण्याकरिता मोठी कसरत करावी लागणार आहे. मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांना दक्षिण नागपूरमधील पारपंरिक मते आपल्याकडे वळविण्यासाठी चांगलीच जुळवाजुळव करावी लागणार आहे.
हिंगणा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. 2009मध्ये विजय घोडमारे आमदार होते. त्यानंतर 2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म समीर मेघे याठिकाणी विजयी झाले आहेत. समीर मेघे यांना भाजपने यंदा पुन्हा एकदा संधी दिली आहे. शिवाय महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित व्हायचा आहे. अशा परिस्थितीत विजयराम किनकर यांच्यापुढेदेखील आव्हान मोठे असेल, हे निश्तिच.
Assembly Election : आघाडीत आणि महायुतीत दोन-दोन जागांत सस्पेन्स कायम !
‘आम्ही पंधरा वर्षांपासून काम करतोय’
विजयराम किनकर आणि आदित्य दुरुगकर यांनी पंधरा वर्षांपासून आपापल्या मतदारसंघात काम करत असल्याचा दावा केला आहे. हिंगणा येथे औद्योगिक वसाहत, रोजगार, आरोग्य आदी मुद्दे असल्याचे किनकर यांनी म्हटले आहे. तर नागपूर दक्षिणमध्ये गुन्हेगारांना सोबत घेऊन चालणारे नेते दोन्ही बाजुंना असल्याची टीका दुरुगकर यांनी केली आहे. लोक दळभद्री राजकारणाला कंटाळले असून मनसे हा एकमेव पर्याय असल्याचेही दुरूगकर यांनी म्हटले आहे.