Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकरच होणार आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे ‘हौसले बुलंद’ आहेत. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशन काळात सरकारला घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवर विरोधक सभागृहात सरकारला घेरणार आहेत. अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी 26 जून रोजी बैठक घेतली.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज मुंबई येथे पार पडली. बैठकीला काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. याशिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अनेक मुद्दे उपस्थित केले. काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात गाजलेल्या प्रकरणांची उजळणी केली. विधान परिषदेत सरकारला कसे घेरावे यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांनी मत मांडले. जयंत पाटील, अबू आझमी देखील या बैठकीला उपस्थित होते.
अनेक मुद्दे वादळी
महाराष्ट्रात सध्या अनेक मुद्दे गाजत आहे. हिट अॅन्ड रनची अनेक प्रकरणे महाराष्ट्रात घडली आहेत. ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरतीवर विरोधकांचा आक्षेप आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. पुणे ‘ड्रग्स फ्री’ करा असे आदेश त्यांनी दिले. यावरून पुण्यात अंमली पदार्थ विक्री होत असल्याचा आरोप विरोधक सरकारवर करू शकतात. शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे विधिमंडळात चर्चेला येतील हे नक्कीच.
विजेचा खेळखंडोबा
राज्यात कोठेही अधिकृत भारनियमन करण्यात घोषित करण्यात आलेले नाही. त्यानंतरही विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अनेक गावे व शहरांमध्ये पाच ते सात तास वीज खंडीत होत आहे. त्यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतेच एक विधान केले. प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, असे ते विधान होते. यावर वादंग झाल्यानंतर मिटकरी यांनी घुमजाव केला. यावरून विरोधक अजित पवारांना महायुतीच्या विरोधात ऐन सभागृहात भडकविण्याचा निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे दिसते.
उज्ज्वल निकम यांनी अलीकडेच लोकसभेचे निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांचावर आता ‘भाजपवासी’ असा शिक्का लागला आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना सरकारने पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्त केले. यावरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे यावर देखील विधिमंडळात वादळी चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर यंदाच्या अधिवेशनात विरोधक सरकारवर हावी होण्याचा प्रयत्न करणार आहे. या हल्ल्यांचा सरकारमधील मंत्री कसे परतावून लावतात, हे रंजक ठरणार आहे.