Shiv Sena On Congress : आमदार नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले नसते तर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले नसते. पटोले यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत हे पद रिक्त होते. त्यामुळे अनेक कायदेशीर अडचणीही निर्माण झाल्या. पटोले यांनी मध्येच पद सोडले नसते तर पेच निर्माण झाला नसता, असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.
महाविकास आघाडीची सत्ता सत्ता जाण्यास नाना पटोले हेच कारणीभूत आहेत. पटोले यांनी अचानक विधानसभा अध्यक्षपद सोडून दिले. आता ते विनोदाचा भाग झाले आहेत. पटोले यांच्या शब्दाला विनोदापलिकडे काहीच अर्थ नाही. महिलांना मिळणाऱ्या योजनेमुळे महिला आनंदित झाल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांना ते बघवत नाही का, असा सवालही त्यांनी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने वरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्याला डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले.
लवकरच कायदा
महिला सुरक्षेची योजना मुख्यमंत्री आणणार आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना अतिशय गंभीर आहेत. कुठल्याही क्षेत्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. जसे रेशन वर्षानुवर्षे मिळत आहे. तसे लाकडी बहिण योजनेचे पैसे देखील मिळत राहतील. पण त्यासाठी निवडणुकीत चांगली कामे करणारी माणसं निवडून देण्याची जबाबदारी नागरिकांची असते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यापासून तर बँकांमधील कामे करण्यापर्यंत महिलांची गर्दी होत आहे. बॅंकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. महिलांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
रांगांमध्ये उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी स्वत:च्या आमदार निधीतून चहापाणी आणि नाश्त्यासाठी दोन लाख रुपये देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, माझ्या कामाची सुरवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे. महिलांमध्ये लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. बदलापूरमधील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर तेथील शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत गंभीर दखल घेतली. तत्काळ पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.