महाराष्ट्र

Maharashtra Legislative Assembly : 8 आमदारांचे राजीनामे मंजूर, परिषदेच्या 5 सदस्यांना निरोप !

Mahavikas Aghadi : आघाडी विरूद्ध महायुती सामना बघायला मिळणार ?

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभेतील 8 आमदारांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पदाचे राजीनामे दिले होते. यांतील नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे राजू पारवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर उर्वरित आमदार आता खासदार झालेले आहेत. या सदस्यांनी राजीनामे दिले होते. ते पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारी पहिल्या दिवशी सभागृहाने मंजूर केले.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

विधान परिषदेचे 5 सदस्य निवृत्त झालेले आहेत. त्यांना विधानभवनाच्या उपहारगृहात गुरुवारी दुपारी 3 वाजता निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये विधान परिषदेचे निवृत्त सदस्य सुरेश धस, प्रवीण पोटे पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे आणि विप्लव बाजोरिया यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या निरोप समारंभाला सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याची सुचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राजू देवनाथ पारवे, निलेश ज्ञानदेव लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वसवंत वानखडे, प्रतिभा सुरेश धानोरकर, संदीपान भूमरे, रवींद्र वायकर, वर्षा एकनाथ गायकवाड यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंजूर केले आहेत. सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर सामान्यपणे त्या जागांसाठी पोटनिवडणूक होत असते. पण आता केवळ तीन महीन्यांनंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आता पोटनिवडणूक होण्याची कुठलीही शक्यता नाही. या रिक्त जागा विधानसभेच्या निवडणुकीतच भरल्या जातील.

तिन्ही पक्ष सोबत..

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणदणीत यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसने राज्यात चांगले यश मिळवले. महाविकास आघाडीमध्ये सोबत मिळून लढल्यामुळे हे यश मिळाल्याचे काँग्रेस नेते मानतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष सोबत मिळून लढतील, असे चित्र सध्या आहे.

दुसरीकडे महायुती मधील तिन्ही पक्ष सोबत मिळून निवडणूक लढतील की नाही, याबाबत स्पष्टता दिसत नाही. आगामी निवडणूक महायुती मिळूनच लढणार, असं ज्येष्ठ नेते सांगत आहेत. पण बऱ्याच ठिकाणी स्थानिक नेत्यांचा महायुतीला विरोध असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना बघायला मिळणार की नाही, हे आत्ताच सांगता येणे अवघड वाटत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!