संपादकीय

Assembly Election : अखेर महाराष्ट्रात बिगुल वाजले

Tug Of War : यंदाची निवडणूक होणार चुरसपूर्ण

या लेखातील मतं ही लेखकांची आहे. या मतांशी ‘द लोकहित’ सहमत असेलच असे नाही.

Maharashtra Politics : जनतेच्या मनातील शिगेला पोहोचलेली उत्सुकता संपली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यावर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचक शब्दात लोकशाहीच्या या उत्सवाचे स्वागत केले. निवडणूक घोषित करायला विनाकारण विलंब करण्यात आला असा सूर विरोधक आळवीत आहेत.

शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडली. वेगवेगळे गट स्थापन झाले. शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट स्थापन झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही शरद पवार आणि अजित पवार असे वेगवेगळे गट पडले. या दोन प्रमुख पक्षात फूट पडल्याने राजकीय वर्तुळात त्यांचे पडसाद ही तीव्र स्वरुपात उमटले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Shrad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील गटांना व्यापक सहानुभूती मिळाली. दोन्ही गटांना मिळत असलेले व्यापक जनसमर्थन राज्यातील सत्ताधारी महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरली. आता महायुतीच्या करिश्म्यामुळे ही लाट काहीशी ओसरली आहे.

आता खरी लढत

महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) महायुतीच्या नेत्यांनी योग्य व्यूहरचना करुन अलगद पाडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही खेळी खेळण्यात आली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना भाजपने साद घातली ते सोबत आले. आणि सत्ता परिवर्तनाचे धाडस दाखविल्यामुळे थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. नंतर अजितदादांनी हिंमत दाखवून आपल्या काकांची साथ सोडली. तेही महायुतीचे घटक बनले. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले.

दोन्ही गटातील सदस्य पात्र, अपात्रतेचा मुद्दा गाजला. निवडणूक जाहीर झाली तरी अद्याप निर्णय प्रलंबित आहे. दोन प्रमुख पक्षांच्या विभाजनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. कोणता गट प्रभावी हे निवडणुकीत दिसून येणार आहे. आपापल्या समर्थकांची ताकद वाढविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गटांनी जोरकस प्रयत्न केले आहेत. आता या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत होणार आहे.

खुर्ची कोणाकडे?

सत्ता सुत्रे महायुतीकडे असल्याने त्यांनी सर्व परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास करून पाऊले उचलली. अनेक योजना आखल्या. त्या सुरू केल्या. लाडकी बहिण, लाडका भाऊ यासारख्या थेट लाभ मिळवून देणाऱ्या योजनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. अलीकडच्या काही दिवसांत सर्व समाज घटकांचे हित लक्षात घेऊन योजना सुरू करण्यात आल्या. जनतेच्या मनात सरकार विषयी सहानुभूती वाढावी हा उद्देश त्यामागे होता.

काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून महायुती व त्यांच्या धोरणांवर सतत टिकेचे आसूड ओढण्यात आले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तर सर्व मर्यादा सोडून बोचऱ्या शैलीत भाजप तसेच शिंदे यांचेवर आसूड ओढले. सरकार महाविकास आघाडीचे येणार असा निर्धार त्यांनी अनेकदा व्यक्त केला. दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून त्यांनी एकनाथ शिंदे यांचेवर टिकेची तोफ डागली.

चेहऱ्याचा शोध

महायुती आणि महाविकास आघाडी यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. दोन्ही बाजूंचे घटकपक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्याचा मुख्यमंत्री असे धोरण ठरले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. महायुतीमध्ये भाजप १५८, शिंदे गट 70, अजित पवार गट 60 जागा लढविणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबतीत पक्षाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सर्व पक्षांचे तिकीट वाटप मेरीट तत्वावर करण्याचे ठरले आहे. उमेदवारास आपली निवडून येण्याची क्षमता सांगावी लागणार आहे.

महाविकास आघाडीतील 218 जागांबाबत एकमत झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दोन दिवसात सर्व जागांवर शिक्कामोर्तब होईल, असे त्यांनी सांगितले. सर्वांत जास्त जागा काँग्रेसला मिळणार आहेत. महायुतीमध्ये सहभागी झालेले नेते सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Assembly Election : उमेदवारांची निवड; गडकरींच्या सहभागाबाबत ‘टॉप सिक्रेट’

प्रचंड चढाओढ

जागा वाटप करताना ती कोणत्या पक्षाकडे जाते यावरुन राज्यातील काही मतदार संघात चढाओढ होण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटू शकतो. दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या मोठी आहे. नाराज झालेल्या व्यक्तींची पावले संधी देणाऱ्या पक्षाकडे वळू शकतात. त्यामुळे ‘तळ्यात-मळ्यातङ सारखे प्रकार वाढू शकतात.

मराठा समाजाला अजून न्याय मिळालेला नाही. आता आपण सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. समाज बा़धवांशी चर्चा करून पुढील रणनीती जाहीर करु, कोणाला निवडणुकीत पाडायचे हे ठरवू असे ते म्हणाले. विधानसभा निवडणूक उशिराने घोषित करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. योजना घोषित करण्यासाठी तसेच ‘जीआर’ काढण्यास वेळ मिळावा, हेच त्यामागचे कारण होते, असे ते म्हणाले.

प्रचाराचा धुराळा

निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा भोंगा वाजवेल असेही वडेट्टीवार म्हणाले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त जागा तातडीने भरण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणूक तारखेची घोषणा झाली. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्याआधी नवीन सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. बहुमताचा कौल कोणाला मिळतो महायुती सत्ता कायम राखते, की महाविकास आघाडी बदल घडवून आणते हे 23 नोव्हेंबरला कळणार आहे. आता महिनाभर गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकीचा धुराळा उडत राहणार आहे.

महायुतीने सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राहाव्या म्हणून जीव तोडून मेहनत घेतली. जाता जाता एक वेगळाच झंझावात निर्माण केला. सर्व प्रयत्न करून झाले आहेत. आता चेंडू जनतेच्या दरबारात पोहचला आहे. महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, बंडखोर, अपक्ष, आंदोलकांचे गट या निवडणुकीत भाग्य आजमवणार आहेत. मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. हरीयाणातील निवडणुकीमुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती व गुंतागुंत वेगळीच आहे. होणरी निवडणूक खूपच चुरसपूर्ण होईल, असेच वातावरण आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!