प्रशासन

UPSC Exam : लाखोंचा पॅकेज नव्हे देशसेवेच्या इच्छेतून विदर्भाचा समीर आयएएस

Civil Services : मूळचा वर्धेकर अन‌् नागपुरात स्थायिक झालेल्या महाराष्ट्राच्या टॉपरशी संवाद

IAS News : ‘खरं तर लखनौच्या आयआयएममधून पदवी घेतल्यावर कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीत लाखो रुपयांचे पॅकेज देणारी नोकरी मिळाली असती. आतही भारतीय रेल्वेत कार्यरत आहे. पण मनाला समाधान मिळत नव्हते. देशसेवेसाठी काहीतरी हटके करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे पुन्हा संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आता देशभरातून 42वा क्रमांक आला आहे. आयएएस होणार आहे. प्रशासकीय सेवेतून समाजातील गरजवंतांना आता खऱ्या अर्थाने मदत करता येईल’, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला आणि देशातून 42वा आलेला मराठी मुलगा समीर खोडे ‘द लोकहित’ला आपल्या मनातील सगळं काही सांगत होता.

 

Education Department : जेव्हा, जिल्हा परिषदेचे सीईओ भरवितात विद्यार्थ्यांचा वर्ग 

मूळ वैदर्भीय असलेला समीर वर्धा जिल्ह्यातील. सध्या तो नागपूरमध्ये कुटुंबासह स्थायिक झाला आहे. नागपुरातील पंडीत बच्छराज व्यास विद्यालयातून समीरने दहावी उत्तीर्ण केली. परीक्षेत तो 24वा मेरीट होता. हाच क्रम बारावीतही कायम राहिला. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या समीने बारावीत मेरीटच्या यादीत 14वे स्थान मिळविले. त्यानंतर नागपूरच्याच व्हीएनआयटीमधून तो बी.टेक झाला. उत्तर प्रदेशातील लखनौच्या आयआयएममधून त्याने एमबीएही पूर्ण केले. पण समीरला बहुराष्ट्रीय कंपनीत लाखोंचे पॅकेज असलेली नोकरी करणे मंजूर नव्हते. त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

पहिले यश लवकरच

जीवतोड परीश्रम घेतल्यानंतर समीरला 2019 मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्यांदा यश मिळाले. भारतीय रेल्वे सेवेत त्याची निवड झाली. सध्या समीर रायपूर येथे एआरएम पदावर कार्यरत आहे. मात्र तरीही समीरला आपण जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले आहे, असे वाटत नव्हते. केंद्र सरकारचा भक्कम पगार होता. रेल्वेची नोकरी होती. पूर्ण आयुष्य आराम जाऊ शकले असते. परंतु समीरला समाजातील गरजवंतांची सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या रुळावर असलेल्या गाडीचा वेग त्याने आणखी वाढवला. दोन ते तीन वर्ष पुन्हा अविरत परिश्रम घेतले. अशातच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा तो दरवाजा समीरला उघडता आला, ज्यासाठी तो प्रयत्न करीत होता.

समीरने देशभरात 42वा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. आता समीर खोडे याच्या नावासमोर समीर खोडे, आयएएस असे लागणार आहे. परीक्षेत यश मिळविल्यानंतर आता समीरने रेल्वेच्या नोकरीतून नियमानुसार भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच रायपूर येथुन समीर नागपूर शहरात दाखल होणार आहे. नागपूरकर समीरचे कार्पोरेट स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजिक मार्केटिंक हे आवडीचे विषय आहे. भारतासह फ्रान्स, नेदरलॅन्ड, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, थायलॅन्ड, इराण अशा देशात समीरने काम केले आहे. मनात आणले असते तर आयआयएम लखनौचा हा एमबीए मुलगा कोणत्याही ‘फाइव्ह स्टार’ देशात ऐशआरामाचे जीवन जगू शकला असता. पण त्याने प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला.

पगार नाही समाधान महत्वाचे

खरं तर एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या तुलनेत प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन हे तुलनेने थोडे कमीच असते. पण देशसेवा आणि समाजात परिवर्तन घडविण्याच्या अनेक संधी या अधिकाऱ्यांना मिळत असतात. एखादा कर्तबगार अधिकारी देशात कोणते परिवर्तन नाही घडवू शकत, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे बँक बॅलेन्स वाढविणारा पगार नव्हे तर समाधान महत्वाचे आहे, असे समीर सांगतो. कॅस्ट्रोल या कंपनीतून करीअरची सुरुवात करणाऱ्या समीरच्या देशसेवेचे इंजिन आता सुसाट पळणार आहे. प्रशासकीय सेवा अधिकाराचे बुस्ट त्याला मिळणार आहे. समाजातील तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचवून समीर विदर्भाच्या नावलौकिकात नक्कीच भर घालेल यात शंकाच नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!