BJP On Congress : विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक मते फुटली ती काँग्रेसची. ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्या आमदारांना पकडण्यासाठी काँग्रेसने यावेळी रणनीती केली होती. त्यात कोणकोणत्या आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले, हे समोर आले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नावे सांगण्यात आलीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि इतर नेत्यांनी बैठक घेऊन अहवाल दिल्लीला पाठवला.
फुटणाऱ्या आमदारांविरुद्ध अहवाल पाठविल्यानंतर कारवाई केली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असे अहवालात सांगण्यात आले. त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. फुटीर आमदारांवर काय कारवाई केली जाणार? याकडे लक्ष लागले आहे. अशात भाजपचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
आघाडीत सारेच ‘क्रॉसिंग’
काँग्रेस पक्षाला त्या आमदारांची नावे माहित आहेत. ज्यांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केली, त्यांची ही नावे आहेत. त्यांनाच आता नेत्यांनी ‘क्लिन चीट’ देण्यात आली आहे. कोणीही नेता यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करणार नाही, असे ठाम मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. फुटणाऱ्या आमदारांवर कारवाई होणे शक्यच नसल्याचेही ते म्हणाले. कारवाई होणारच नसल्याने या आमदारांना दिलासा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काम प्रत्येक बाबतीत ‘क्रॉस’ करण्याचेच आहे. महाविकास आघाडी समाजात विष पेरत आहे. खोटा प्रचार करीत आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवित आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. खोटे बोला पण रेटून बोला, अशी त्यांची वृत्ती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाविकास आघाडीच्या लंकेत अनेक विभीषण आहेत. यांच्या लंकेत द्वेषाचा महासमुद्र वाहत आहे. अहंकाराच्या ज्वाळा या लंकेत आहेत. त्यामुळेच लंका कोणामुळे दहन झाली हे रावण कधीच सांगत नसतो. विभीषणाचे नाव रावणाला सांगायचे असते का? विदुराने केलेले कार्य कौरव ऐकतच नसतात. अशा पद्धतीने कधी काम होते का? असा प्रश्नही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
काँग्रेस आधीच विखुरलेली आहे. त्यात अनेक गट आहेत. अपप्रचाराच्या आधारावर त्यांची थोडी ताकद वाढली आहे. परंतु असत्याला दीर्घायुष्य नसते. ही बाब काँग्रेसला ठाऊक आहे. त्यामुळे ते फुटीर आमदारांवर कारवाई करूच शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.