या लेखातील मतं लेखकाची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.
NCP Ajit Pawar : राजकारणात प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. तरीही अनवधानाने किंवा भावनेच्या भरात एखादी चूक होतेच. कधी ही चूक सत्ता खुर्चीच्या मोहाने होते. कधी मागचा पुढचा विचार न करता घेतलेल्या निर्णयाने होते. काही वेळेस असे निर्णय तकलादू ठरतात. त्याची खंत मनाला लागून राहते. याच अवस्थेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस झालेली चूक दादांना स्वस्थ बसू देत नाही. बहिण सुप्रिया यांच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली, ही आपल्याकडून मोठी चूक झाली. याबाबत दादांना सतत खंत वाटत राहते. जमेल तिथे ते या संदर्भात आपले मन मोकळे करायला ते विसरत नाहीत. अजितदादांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. ‘माझ्याकडून चूक झाली. आता युगेंद्रने ती करू नये’, असे त्यांनी बोलून दाखविले.
आईचा विरोध
‘माझ्या आईचा माझ्या विरूद्ध युगेंद्र याने निवडणूक लढविण्यास विरोध आहे’, असे वक्तव्य दादांनी केले. अजित दादांनी भावनिक साद घालत आपले मन मोकळे केले. हे खरे असले, तरी त्यांच्या लहान भावाने मात्र या विधानाचे बाबतीत अजितदादांना खोटे ठरविले आहे. आई असे बोललेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आईला दादा आणि नातू दोघेही सारखेच आहेत, असे युगेंद्रचे वडील श्रीनिवास पवार यांनी सांगितले.
श्रीनिवास पवार यांनी कुटुंबात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. सुप्रिया यांच्या विरोधात वहिनींनी निवडणूक लढविणे कुटुंबातील कोणालाही आवडलेले नाही. दादांचे मत वळविण्याचा सर्वांनी आटोकाट प्रयत्न केला. पण दादांनी कुणाचे ऐकले नाही. जी बहिण आपल्या अंगाखांद्यावर खेळली, आपल्या समोर जिने पहिली पावलं टाकली, तीच्या विरोधात वहिनींना उभे करु नकोस, असे सांगून पाहिले. दादाने कुणाचेही ऐकले नाही. आता झालेल्या गोष्टीबद्दल त्याला पश्चात्ताप होतो आहे. जखम भरेल पण त्याचे व्रण मात्र कायम राहणार आहेत, असेही ते म्हणाले.
भाजपचे कारस्थान
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. राजकारणातील घडामोडींचा कुटुंबावर परिणाम होऊ न देण्याची दक्षता सारेच घेत आहेत, असेही ते म्हणाले.युगेंद्रच्या मागे शरद पवार यांचे पाठबळ आहे. त्यांच्याच आशीर्वादाने तो निवडणूक लढवतो आहे, असेही त्यांनी सांगितले. बारामतीत शरद पवार यांचाच शब्द चालतो हे सांगायला ते विसरले नाहीत. युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊन फारसा गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीत येथील काका आणि पुण्यामधील ही लढत लक्षवेधी ठरत आहे.