देश / विदेश

Union Budget : अर्थसंकल्पाबद्दल अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आणखी एक अर्थसंकल्प देशवासियांची मने जिंकणारा आहे, असेही ते म्हणाले.

मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधण्याचे काम यातून होणार आहे. यासोबतच वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

एनडीए सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील देशवासियांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

विकसित राष्ट्राचे स्वप्न

देशाला विकसित राष्ट्र, विश्वशक्ती बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचे स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शेती क्षेत्रात उत्पादकता वाढ, रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकासावर भर हे याचे वैशिष्ट्य आहे. मनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायाकडे विशेष लक्ष, उत्पादन व सेवाक्षेत्राचा विकास, शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर यातून समतोल साधण्याचा प्रयत्न होणार आहे. ऊर्जासंरक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, संशोधन व विकासाला प्राधान्य, नव्या पीढीसाठी सुधारणा या क्षेत्रांना दिलेलं प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारं आहे, असेही अजितदादांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे कल्याण

शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची केलेली तरतूद अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

युवक कल्याणाच्या दिशेने प्रवास

युवकांना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून पुढील 5 वर्षात 20 लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘ईपीएफओ’मधील नोंदणीवर आधारित योजनेंतर्गत, पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना 1 महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाणार आहे. 21 कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे. पुढील 5 वर्षात देशातील 500 कंपन्यांमध्ये किमान 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात 12 इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होईल असा मला विश्वास आहे, असेही अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!