महाराष्ट्र

Nana Patole : आरक्षणाचा पेच भाजपामुळेच

Congress Stand : पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवावा

­Targets BJP : महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा भाजपने निर्माण केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण दहा वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. 

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने राज्यातील जातींमध्ये भांडण लावण्याचे पाप केले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा संपविण्याचे काम केले आहे. भाजपने मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल केली. आरक्षणाबाबत सत्तेतील लोकांना निर्णय घ्यायचा असतो. असे असताना ते विरोधी पक्षांनाच प्रश्न विचारत आहेत. काँग्रेसची आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका आहे. जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी आहे. आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा हटविली गेली पाहिजे, असे खासदार राहुल गांधी जाहिरपणे सांगत आहेत. हे काम केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे पटोले म्हणाले.

भूमिका जाहीर केली

पटोले म्हणाले, काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात मराठा समाजातील लोकांची भेट घेतली. त्यांच्यासमोर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. पुन्हा कोणी भेटणार असेल तर त्यांचेही स्वागत आहे. त्यांच्याशीही चर्चा करु असेही नाना पटोले म्हणाले. लाडकी बहिण योजनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मध्य प्रदेशात भाजपने ‘लाडली बहना’योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली होती. सरकार येताच ती योजना बंदही केली. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तोंडावर भाजपप्रणित महायुती (Mahayuti) सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. महिलांच्या मतांवर डोळा ठेवूत ही योजना आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या अनेक योजना काँग्रेस सरकारनेच सुरू केल्या आहेत. कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारची महालक्ष्मी योजना सुरू आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजना मोठ्या प्रमाणात राबवेल, असा शब्दही पटोले यांनी दिला. राज्यात पूरस्थिती भयानक आहे. सरकारने अद्याप पंचनामा करण्याचे आदेश दिलेले नाहीत. नुकसानग्रस्त लोक सरकारी मदतीची अपेक्षा करीत आहेत. पण महायुती सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवावी. तेलंगणातील काँग्रेस सरकारप्रमाणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही, तर काँग्रेस मविआचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!