Students In Problem : बांगलादेशात सध्या अराजकता परसली आहे. येथे अनेक भागात मोठ्याप्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. या नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, यासाठी शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः हिंसाचार सुरू असलेल्या भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी तेथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधत शिंदे यांनी बांगलादेशातील परिस्थित गांभीर असल्याचे सांगितले. त्यामुळे तत्काळ येथे मोहिम राबवित अनेकांना सुखरूप बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली. हिंसा प्रभावित भागातील विद्यार्थ्यांना सर्व शक्यती सर्व मदत करण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा तत्काळ सुनिश्चित करावी असे शिंदे म्हणाले. आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. भारतात त्यांना सुरक्षित परत आणण्याची प्रक्रिया वेगाने करावी लागेले. त्या अनुषंगानेही मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली.
माहितीचे संकलन सुरू
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची माहिती मिळविण्यात येत आहे. त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहे. बांगलादेशात असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाला ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकार तत्काळ संपर्क साधणार आहे. योग्य ती मदत उपलब्ध करुन देणार आहे. बांगलादेशातील परिस्थितीवर केंद्र सरकार सतत लक्ष ठेवून आहे. केंद्रीय अधिकारी प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य सरकारमार्फत एक पथकही नेमण्यात आले आहे.
बांगलादेशातील भारतीय दूतावास आणि केंद्र सरकार समन्वयाने काम करीत आहे. या समन्वयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करता येतील, असेही शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांना मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.
सर्वपक्षीय बैठक
बांगलादेशातील हिंसाचार आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी (6 ऑगस्ट) संसद भवनात सर्वपक्षीय बैठक घेतली. परराष्ट्र मंत्री ए. वाय. जयशंकर यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना शेजारील देशातील सद्य:स्थितीची माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला काही प्रश्नही विचारले. बांगलादेशातील हिंसाचारामागे विदेशी शक्ती, विशेषत: पाकिस्तानचा हात असू शकतो का? असे राहुल गांधी म्हणााले. राहुल गांधी यांच्या प्रश्नाला सरकारने उत्तर दिले आहे. एक पाकिस्तानी मुत्सद्दी बांगलादेशातील हिंसाचाराची छायाचित्रे सोशल मीडियावर त्याच्या प्रोफाइल फोटोवर सतत पोस्ट करत आहे. त्यामुळे या अँगलमधून तपास केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बांगलादेशातील सत्तापरिवर्तनाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी भारत सरकारची अल्पकालीन आणि दीर्घकालीन रणनीती काय आहे? असेही राहुल म्हणाले. त्यावर बांगलादेशमध्ये परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे उत्तर परराष्ट्रमंत्र्यांनी दिले. त्याचे पुढील पाऊल ठरवण्यासाठी केंद्र त्याचे बारकाईने विश्लेषण करत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी (ता. 5) संध्याकाळपासून भारतात आश्रय घेतला आहे. त्या सध्या शॉकमध्ये आहेत. त्या पुढे काय करणार याचा विचार करण्याआधी त्यांना भारत सरकारने वेळ दिल्याचे जयशंकर म्हणाले.
दहा हजार विद्यार्थी अडकले
बांगलादेशात दहा हजारावर भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत सरकारने बांगलादेशाच्या लष्कर प्रमुखांशी चर्चा केली आहे. बांगलादेशी आंदोलकांनी तेथील अल्पसंख्यांकाची घरे लक्ष्य केली आहे. शेजारी राष्ट्रातील लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांना वाचण्याचे प्रयत्न भारत सरकार करीत आहे. बांगलादेशात एकूण 20 हजार भारतीय सद्य:स्थितीत आहेत. त्यापैकी आठ हजार लोक भारतात परतले आहेत. उर्वरित लोकांच्या संपर्कात भारत सरकार असल्याचे सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ शिंदे, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, किरेन रिजीजू आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासह के. सी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.