महाराष्ट्राच्या इतिहासात कधी कुणाला नव्हे येवढं भव्य यश महायुतीला मिळालं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज (5 डिसेंबर) सायंकाळी फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही पदांची शपथ घेणार आहेत. पण इतर मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता कमीच आहे.
आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी होणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. ते म्हणाले, निश्चितपणे एक कर्तबगार भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतुट विश्वास व्यक्त केला. तो नेता या राज्याचा कर्णधार म्हणून जेव्हा काम करेल, तेव्हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पावर वेगाने पुढे जाईल.
आज इतर मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत का, असे विचारले असता, आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. येवढंच सध्या ठरलंय. बाकी मंत्र्यांचा शपथ विधी नंतर होईल. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची जास्त शक्यता आहे. कारण केवळ तिघांच्या जवळ जर इतके सर्व खाते आले, तर मग कामात अडचण येईल. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चितपणे होईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावर कालपर्यंत खूप चर्चा झाल्या. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाहीये, अशा बातम्या सर्वत्र उमटल्या होत्या. तेव्हाही सुधीर मुनगंटीवार यांनी मुळातहा तिढा नाहीच आणि महायुतीच्या डिक्शनरीमध्ये ‘तिढा’ हा शब्दच दूरदूरपर्यंत नाहीये, असे मुनगंटीवार यांनी सांगितले होते. याशिवाय आजवरच्या सरकार स्थापनेच्या तुलनेत सर्वाधिक कमी कालावधीत महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे वक्तव्य त्यांनी गेल्या आठवड्यात केले होते. आज त्यांचे ते वक्तव्य खरे ठरले आहे.
‘ते’ सकाळी उठले की मिठ घेऊन फिरतात..
भाजप आता एकनाथ शिंदेंना संपवून टाकेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. याबाबत विचारले असता, सकाळी 10 वाजता उठायचं आणि हाती मिठ घ्यायचं. त्यानंतर काय काय नासवता येतं, ते नासवायचं, येवढंच त्यांचं काम आहे. हे त्यांना संपवतील, ते यांना संपवतील, यापेक्षा वेगळं आता ते काय बोलणार, असा प्रतिप्रश्न मुनगंटीवार यांनी केला.