Power Play For Election : राज्यात मतदार ओळखपत्रात मोठा घोटाळा झाला आहे. भाजपकडून यासंदर्भात आरोप करीत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक (Assembly Election) अगदी जवळ आली असताना भाजपने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मतदार ओळखपत्राच्या नावावर फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासंदर्भात काही आक्षेप भाजपने नोंदविले आहेत. धुळ्यात मतदार म्हणून तीन हजार लोकांची नावे आहेत. मालेगावमध्येही तितक्याच लोकांची नावे असल्याचा भाजपचा दावा आहे. तक्रार करीत भाजपने निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह लावले आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. या पत्रातून भाजपने निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ळे आणि मालेगाव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात काही नावे सापडली आहेत. ही संख्या तीन हजारावर आहे. जे मतदार मालेगावमध्ये आहेत तसेच धुळ्यातदेखील आहेत. मतदार ओळखपत्र, मतदार ओळखपत्र क्रमांक, फोटो एकच आहे. असे असताना निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिले नाही, असा आक्षेप बावनकुळे यांनी घेतला आहे.
कारवाईची मागणी
मतदार ओळखपत्रातील घोळ पाहता धुळ्यात जे 50 हजार लोक मतदान करतील, तेच मालेगावमध्ये मतदान करतील, असे दिसत आहे. धुळ्याची जागा सोडायची असेल तर तिथे मतदान करू, मालेगावची जागा जिंकायची असेल तर तिथे मतदान करू, ही मानसिकता आणि हेतू असल्याचे या दिसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. चुकीच्या पद्धतीने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केल्याचे दिसत आहे. त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे, अशी माणगी बावनकुळे यांनी केली.
मतदार ओळखपत्रातील बनवेगिरी मोठे षडयंत्र आहे. या घोळात एका विशिष्ट समाजातील लोक दिसत आहेत. भाजप कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. परंतु हा प्रकार घडल्याचे दिसत आहे. धुळे आणि मालेगावमध्ये तीन हजार मुस्लिम कुटुंब आहेत. त्यांची नोंद दोन ठिकाणी झाली आहे. 2019 मध्येही बूथवरून आमच्या मतदाराचे नाव काढून त्यावर शिक्का मारण्याचा कट रचला गेला होता, असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला. यासंदर्भात सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मतदार ओळखपत्रात घोळ करणाऱ्यांना शोधण्याचे काम निवडणूक आयोगाला करावे लागणार आहे. तसे न झाल्यास निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता आहे, असे बावनकुळे म्हणाले.