Festival Of Lights & Democracy : दीपावलीच्या मंगलमय महोत्सवास सुरुवात झाली आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, मनात नवी आशा जागवून नवी दिशा दाखविणारा हा सण. दिव्यांच्या लख्ख प्रकाशात सारे उजळून निघते. मनातील सारी जळमटे काढून आपणही असेच उजळून निघायला हवे. दिव्याला आपण ज्ञानाचे प्रतिक मानतो. हा ज्ञानदीप आपल्या हृदयात चेतवून आपले जीवन उजळून टाकायला हवे. यावर्षी आपण दिवाळीनंतर लोकशाहीच्या मोठ्या उत्सवास सामोरे जाणार आहोत.दोन्ही उत्सव महत्वाचे आहेत. एक उत्सव मनामनात चैतन्य प्रेरणारा आहे तर दुसरा समाज जीवनाला आकार देणारा आहे.
दिवाळी म्हणजे सणांचा राजा. या सणाची चाहूल लागली की सर्वांची लगबग सुरू होते. तसेही सण उत्सव साजरे करण्यात आपण आघाडीवर असतो. दिवाळीत हा उत्साह ओसंडून वाहत असतो. या मंगल पर्वाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतात. नाती उजळून निघतात. हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव साजरा करण्यामागे काही उदात्त संकल्पना आहेत. त्यातून आपल्याला नवा विचार आणि प्रेरणा मिळते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला असेच विशेष महत्त्व आहे.दीपावलीची सुरूवात गोवत्स व्दादशीपासून अर्थात वसुबारसेने होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा आहे. आता तर गाईला राज्यमाता म्हणून गौरविले आहे.
प्रकाश उत्सव
प्राचीन काळापासून आपण गोधन महत्वाचे मानतो. तिच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेतून तिची पूजा करुन हा दिवस साजरा केला जातो. मंगळवारी धनत्रयोदशी साजरी झाली. समुद्र मंथनातून प्रगट झालेल्या धन्वंतरी देवतेच्या आराधनेचा दिवस. धन्वंतरी ही आरोग्य देवता. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या आरोग्य संपदेचे महत्व आपल्या मनावर ठसविले जाते. आपला देश कृषीप्रधान आहे. या दिवसात धान्य घरी यायला सुरुवात होते. धान्य संपदेची पूजाअर्चा केली जाते. सोन्याचांदीच्या दागिन्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.
नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या दैत्याला यमसदनी धाडले. आपणही आपल्या मनातील राग व्देष आळस या सारख्या रिपूंचा नाश करायला हवा. आपल्या मनात प्रेमभाव, आदर, उत्साह उमेद जागवून वाटचाल करायला हवी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे विधीवत पूजन करून सर्वांच्या धन धान्य तसेच वैभव समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. पाडवा अर्थात बलीप्रतिपदा हा कृषी संस्कृतीचा द्योतक मानला जातो. प्रल्हादाचा नातू दानशूर बलीराजा याचेप्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. नाते संबंधातही हा दिवस महत्वाचा आहे. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. बहिण भावाच्या निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.दिवाळीत केवळ दिव्यांचा झगमगाट करून चालणार नाही.
जीवन आनंदी आणि समाधानी सुखी करायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या हृदयात स्नेहाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. या भावनेतून दिवाळी साजरी केली तर सर्वत्र आनंद नांदेल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ‘दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सुर्ये पावो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, अशी विश्व प्रार्थना आपल्या पसायदानातून केली आहे. दीपोत्सवाचा आनंद घेताना लोकशाहीच्या उत्सवाचाही आनंद घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणी जरुरी आहे.
विकासासाठी..
दिवाळीनंतर महाराष्ट्रातील जनता लोकशाहीच्या उत्सवाला सामोरी जाणार आहे. तसेही या उत्सवाचे फटाके महिनाभरापासून वाजत आहेत. सारे वातावरण निवडणूक या विषयानेच भारावले आहे. एकमेकांना फटाके लावण्याचे हे दिवस आहेत. राजकीय स्पर्धेतून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. स्पर्धा वाढली आहे. अपक्ष, छोटे पक्ष आणि अंतर्गत बंडखोरीमुळे मोठ्या पक्षांच्या उमेदवारांची धास्ती वाढली आहे. नाराजीचा सूरही उमटतो आहे.
मतदारांच्या संख्येत वाढ
महिला तसेच नव मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. सुज्ञ मतदार म्हणून आपण कर्तव्य भावनेने मतदान करायला हवे. लोकशाहीतील आपला अधिकार प्रत्येकाने बजावला पाहिजे. कमी मतदान झाल्यास वेगळे परिणाम दिसतात. चांगल्या उमेदवारांना त्याचा फटका बसतो याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 रोजी मतमोजणी होणार आहे. कोण विजयाचे फटाके उडवतात आणि कोणाला फटाके लागतात हे त्याचं दिवशी समजणार आहे. निवडणूक सौहार्दाच्या वातावरण पार पडावी. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. अशात या दोन्ही उत्सवांमुळे वातावरणात वेगळीच ऊर्जा आहे.