Political News : लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा अद्याप बाकी आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतील. परंतु आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रा सोबतच हरियाणाची देखील निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम
दोन महिन्यांपासून सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. काल लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले. सात टप्प्यात लोकसभेचे मतदान होणार आहे. लोकसभा निकालाची उत्कंठा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. 26 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची मुदत संपणार आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तर हरियाणा विधानसभा उशिरात उशिरा 4 नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे.
AIMIM Stand : लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या कार्यकाळ वाढीवर ओवेसींचा आक्षेप
दिवाळी आॅक्टोबरच्या शेवटी
यावर्षी दिवाळीचा सण 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान आहे. तसं पाहिलं तर सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र, हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार असल्याची शक्यता आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यामुळे याही वेळी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तारखेचा जर विचार केला तर ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 21 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतच लागले विधानसभेचे वेध!
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. कारण हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार आहे. त्यामुळे आधीच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले होते. जवळपास सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. काही राजकीय पक्षांनी तर विधानसभा निवडणुकीचे ध्येय ठेवून कामाला लागा असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.