Political News : यावेळची लोकसभा निवडणूक जशी रंगतदार झाली, तशीच विधानसभा निवडणुकही होणार आहे. विदर्भात काय होणार, वैदर्भी जनता कुणाला कौल देणार, याचा अंदाज भल्याभल्यांना लागेनासा झाला आहे. लोकसभा निवडणुकीची गणिते विधानसभेच्या निवडणुकीत लागू पडत नाहीत, असे सांगत आमचीच सत्ता येणार, असे महायुतीचे नेते सांगत आहेत.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. त्यामुळे नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा सुपडा साफ होईल, असा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत. काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या जोरात दिसत आहे. पण विदर्भात महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि महायुतीतून भाजप, या दोन पक्षांमध्ये टक्कर अपेक्षीत आहे.
विधानसभेचे वारे
अवघ्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. अशात सर्व विद्यमान आमदारांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्याची शाश्वती नाही, असं काही घडामोडींवरून दिसतं. राजकीय जाणकारांचंही तेच मत आहे. कारण पूर्व विदर्भातील काही मतदारसंघांत भाजपकडून ‘एकला चलो रे..’चा नारा दिला जात आहे.
काही अपक्ष आमदार जे नंतर शिंदे सेनेत गेले. त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली तर भाजप त्यांच्यासोबत राहिल की नाही? सोबत आहे असे दाखवून गेम तर करणार नाही, अशा चिंता त्यांना सतावत आहेत. भंडारा-गोंदियातील एका आमदार महोदयांनी तर आत्तापासूनच अपक्ष लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी काही लोकांना बोलावून मनधरणीसुद्धा केलेली आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली तरी अन् नाही मिळाली तरीही मदत करण्यासाठी ‘त्या’ आमदार महोदयांनी साकडे घातले आहे.
Arvind Kejriwal : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर
आमदारात धाकधूक
भंडारा-गोंदिया प्रमाणेच नागपूर ग्रामीणमधील एका अपक्ष आमदारांचेही तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे शिंदेंकडून ‘सुरक्षित अंतर’ ठेवले जात असल्याची माहिती आहे. 2019मध्ये हे आमदार अपक्ष निवडणूक लढले अन् निवडूनही आले. शिंदे गटात प्रवेश केला नाही. पण भाजपशी जवळीक वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. पण भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यातील या अपक्ष आमदार महोदयांना यावेळी अपक्ष लढत पाहिजे तेवढी सोपी दिसत नाही. कारण त्यांचे निवासस्थान असलेल्या गावातच त्यांच्याबद्दल नाराजी वाढली असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय भाजपकडून रामटेकमध्ये परखल्याशिवाय कुणालाही उमेदवारी मिळणे येवढे सहज वाटत नाही. माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर भाजप नेते तर नाराज आहेतच. पण लोकही नाराज असल्याचे दिसते.
गज्जू यादव यांची इच्छा
रामटेक गोळवलकर गुरूजी यांचे मुळ गाव आहे आणि त्यांचे घर अजूनही तेथे आहे. येथील बरेच लोक संघाच्या ‘थिंक टॅंक’मध्ये आहेत. अशात 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढून पराभूत झालेले नेते उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव मागील काळात भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांचीही विधानसभा निवडणूक लढण्याची प्रबळ इच्छा आहे. भाजपकडून सध्यातरी एकाही माजी आमदाराचा विचार केला गेलेला दिसत नाही. त्यामुळे आपला विचार केला जाऊ शकतो, असे गज्जू यादव यांना वाटणे साहजिक आहे. पण त्यासाठी ही जागा महायुतीमध्ये भाजपसाठी सुटली तरच हे शक्य आहे.