Maharashtra Government : उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः! असा संस्कृत श्लोक आहे. अर्थात जगात कोणतेही काम केवळ विचार केल्यानं पूर्ण होत नाही. त्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात. दिवसरात्र राबावं लागतं. कुरूक्षेत्रात भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला काहीही झालं तरी आपल्या कर्तव्याला चुकू नकोस, असा मौलिक उपदेश दिला होता. श्रीकृष्णाच्या याच उपदेशानुसार वाटचाल करणारे, लोकसेवेच्या आपल्या कर्तव्याला कधीही न चुकणारे लोकनेते सुधीर मुनगंटीवार हे राजकारणाच्या कुरूक्षेत्रातील अर्जुनच ठरले आहेत, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सुमारे 30 वर्षांपासून सुधीर मुनगंटीवार हे लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवा करीत आहेत. मुनगंटीवारांच्या कार्यालयात आला आणि काम न होता घरी परतला, असं शक्यतोवर होत नाही.
जनसेवेचं कर्तव्य
ज्या दिवशी पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून शपथ घेतली, त्याच क्षणी त्यांनी आपल्याला जनसेवेचं कर्तव्य चोखपणे पूर्ण करायचं आहे, असा निश्चय केला होता. भगवद्गितेत सांगितल्याप्रमाणे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या संदेशाप्रमाणे जय, पराजय, पद, प्रतिष्ठा या कशाचीही तमा न बाळगता सुधीर मुनगंटीवार यांनी आजतागायत केवळ विकास आणि विकासाचाच ध्यास घेतला. आपल्या या ध्यासातूनच त्यांनी अनेकांना आपलंसं करून घेतलं. ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया.’ जनसेवा करताना जात-पात-धर्म-पंथ न पाहता आपलं कर्म अन् कर्तव्य निभावणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी आज मोठा जनसमुदाय आहे.
विरोधी पक्षात असो किंवा सत्तेत, सुधीर मुनगंटीवार या नावानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात डंका गाजवला आहे. संसदीय आयुधांचा वापर करीत मुनगंटीवार यांनी पुणे, नागपूर, अमरावती विद्यापीठाच्या नामविस्तारात सिंहाचा वाटा उचलला. ‘देहापेक्षा कर्तव्याचा मान लाखोपटीने उत्तम असतो आणि चिरंतर ही (अमर) असतो’, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे. त्याच तुकडोजी महाराजांचे नाव मुनगंटीवार यांच्यामुळे नागपूर विद्यापीठाला मिळालं. वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला अन् क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाची पहिली वीट रचली ती सुधीर मुनगंटीवार यांनीच. आता या विद्यापीठाला ‘ट्रायबल’ विद्यापीठाचाही दर्जा मिळणार आहे.
Sudhir Mungantiwar : बळीराजासाठी पुन्हा सरसावले चंद्रपूरचे सुपुत्र
आशीर्वाद
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: उच्च शिक्षण मिळवलं. इतकंच नव्हे तर विदर्भातील तरुणाईला अत्याधुनिक शिक्षणाची द्वार खुली व्हावी, यासाठी त्यांनी संघर्षही केला. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाचं एक उपकेंद्र चंद्रपुरात आहे, हे मुनगंटीवार यांच्याच परिश्रमाचं फलित. मातापित्यांच्या सन्मानाखातर प्रभू श्रीरामानं राजवैभवाचा त्याग केला. अशात मातापिता स्वरूप निराधारांच्या मानधनात वाढ करण्याची किमया करून दाखविली ती सुधीर मुनगंटीवार यांनीच. राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं आजही लाखों ज्येष्ठांचे हात त्यांनी आशीर्वाद देण्यासाठीच सरसावतात.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रानं सर्वांत पहिलं ‘सरप्लस बजेट’ सादर केलं. 11 हजार 975 कोटींचं हे बजेट तयार करणारे हात सुधीर मुनगंटीवार यांचेच होते. ‘सेवितव्यो महावृक्ष: फलच्छाया समन्वित:||’ अर्थात एका वृक्षाची सेवा केली तर ते फळ आणि छाया दोन्ही देते. यावर ठाम विश्वास ठेवत राज्याचे वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात विक्रमी वृक्षचळवळ उभी केली. 50 कोटी वृक्ष लागवडीचा ‘गिनिज’ रेकॉर्ड मुनगंटीवार यांनीच रचला. एखाद्या राज्याचा वनमंत्री असा जागतिक विक्रमही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. तोपर्यंत वन खात्याला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. वनमंत्री असतानाच त्यांनी देशातील सर्वोत्तम वन अकादमी चंद्रपूरच्या मातीत आणली.
धोरण तयार
महायुती सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय या खात्याची जबाबदारी आली. तोपर्यंत सांस्कृतिक कार्य विभाग फारसा कुणाला ठाऊक नव्हता. परंतु सुधीर मुनगंटीवार यांच्या हातात या विभागाची सूत्रं येताच. परिवर्तन घडलं. महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण तयार झालं. महाराष्ट्राला ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..’ असं सांगणारं राज्यगित मिळालं. श्रीकृष्णानं उपदेश दिलेल्या कर्तव्यपथावर चालताना शुरांनाही मानाचा मुजरा करायचा असतो, हे मुनगंटीवार यांना ठाऊक होतं. त्यामुळं रक्ताच्या थेंबाथेंबात ‘जाणता राजा’च्या पराक्रमाच्या गाथा साठवलेल्या मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून ते कार्य करून दाखवले जे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून आलेल्या अफजल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण आणि अतिक्रमण उद्ध्वस्त करण्याचं धाडस दाखविलं ते केवळ सुधीर मुनगंटीवार यांनीच. छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्राच्या ज्या ताजमहालात अवमान करण्यात आला होता, त्याच महालात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा निनाद झाला तो सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळंच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहोळ्याचे 350 वे वर्ष दिमाखात साजरे झाले, ते त्यांच्याच शिवप्रेमातून. गडकिल्ल्यांचं संवर्धन, दरवर्षी शासकीय निधीतून शिवराज्याभिषेक सोहळा, अशी मुहूर्तमेढ रोवली गेली ती सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळंच.
मानाचा दिवस
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं वापरली होती. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या वाघनखांना सातासमुद्रापार जाऊन महाराजांच्याच स्वराज्यात आणण्याची मोहिम फत्ते केली ती सुधीर मुनगंटीवार यांनीच. मत्स्यव्यवसाय विभागही फारसा कोणाला माहिती नव्हता. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी कोळी, मासेमार बांधवांसाठी अशा कल्याणकारी योजना आणल्या, सोबतच मच्छिमारांसाठी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले. विभाग कोणताही असो, खातं कोणतंही असो, काम कोणतंही असो सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाची पद्धत म्हणजे ‘परीस ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करेल’ अशीच आहे. त्यामुळं खातं कोणतंही असो, त्यावर सुधीर मुनगंटीवार हे नाव कोरलं गेलं की, त्या विभागातून ‘रेकॉर्ड ब्रेक’ ऐतिहासिक, विक्रमी, न भुतो न भविष्यती असं काम झालंच म्हणून समजावं. त्याचं कारण म्हणजे ‘नाम उसी का होता है, जो दिलजान और सच्चाईसे अच्छा काम करता है.’