आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपावरून चर्चाही सुरू झाल्या आहेत. अशातच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. अद्यापही जागावाटपावरून चर्चा झाली नसल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे.
गुरूवारी (ता. 29) अकोल्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी महादेव जानकर हे अकोल्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत.
जागावाटपावरून चर्चाही सुरू आहेत. मात्र महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारकडूनही तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू आहेत. तिसऱ्या आघाडीबाबत निर्णय आपण 15 दिवसांत जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी बुधवारी (ता. 28) छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे. तर दुसरीकडे महायुतीतील आणखी एक घटकपक्षानेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून राज्यभरातील मतदारसंघात स्वबळाची चाचपणी केली जात आहे.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्वबळाची तयारी करण्यात येत आहे. राज्यातील 288 मतदारसंघांत लढण्यासाठी आमची तयारी सुरू असल्याची माहिती रासप नेते महादेव जानकर यांनी अकोल्यात दिली. अकोल्यात आज रासपचा 21वा वर्धापन दिन सोहळा होत आहे. यावेळी महादेव जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले जानकर !
महादेव जानकर म्हणाले, आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत. घटकपक्ष हा युतीची तयारी करत असतो. शेवटच्या पाच दहा मिनिटांत युती होत असते. त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं आपला जनाधार वाढला पाहिजे. त्यासाठी आमच्या राज्याच्या कार्यकारणीने ठरवलं आहे. आम्हाला 288 जागा लढवायच्या की त्यांच्याकडून ठराव आल्यानंतर मंथन करायचे, हे ठरवू. मात्र आज प्रत्येक मतदारसंघात संघटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले असल्याचं जानकर म्हणाले.
जागांबाबत अद्यापही महायुतीतील कोणत्याच नेत्यांशी आमची चर्चा झाली नाही. मात्र आमच्या कार्यकारीणीने ठरवलं आहे की, त्यानुसार 288 मतदारसंघांत लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्ंयापैकी 109 ठिकाणी आमचं पोलिंग बूथ तयार झालं आहे. मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळावं. मात्र ओबीसीतून देऊ नये. महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही जानकर म्हणाले. नारायण राणे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये. मिडियाशी बोलताना संयमाने बोललं पाहिजे, असा सल्लाही महादेव जानकर यांनी नारायण राणे यांना दिला.