Rashtriya Samaj Paksha : मुंबईत शनिवारी (ता. सहा) पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी दांडी मारली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. बैठकीला महायुतीमधील घटकपक्ष असलेले रासपचे नेते महादेव जानकर उपस्थित न राहिल्याने चर्चांना उधाण आले. महादेव जानकर यांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. या बैठकीचे आपल्याला निमंत्रण होते. मात्र पक्षाच्या कार्यक्रमासाठी काही दिवस आपण विदर्भात असल्याने उपस्थित राहू शकलो नाही, असं जानकर यांनी म्हटलं आहे. शनिवारी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे त्यांनी याबाबत संवाद साधला. महायुतीचा घटकपक्ष असूनही जानकर का उपस्थित राहिले नाहीत, याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. परभणी मतदारसंघातून उभे असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा निवडणुकीत पराभव झालाहे. त्यानंतर महादेव जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
विधान परिषदेकडे लक्ष
विधान परिषदेत (Vidhan Parishad) 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी भाजपने (BJO) आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांनाही विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे जानकर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि विधान परिषद निवडणूक सुरू असतानाच महायुतीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महायुतीतील प्रमुख तीन पक्षांसह घटक पक्षाचे नेतेही उपस्थित आहेत. महायुतीच्या बैठकीला सर्व आमदार, खासदार तसेच तीनही पक्षातील पदाधिकारी उपस्थित आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर महायुतीकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची (Lok Sabha) परिस्थिती, महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय, विधानपरिषद निवडणूक संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र बैठकीला रासप नेते महादेव जानकर उपस्थित नाहीत.
पक्ष कार्याला प्राधान्य
अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर येथे पक्षाच्या मेळाव्याला जानकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पक्षााच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. बैठकीचे निमंत्रण होते. मात्र पक्षाच्या कार्यक्रमासाठी काही दिवस विदर्भाचा दौरा करीत आहे. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असं जानकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणाऱ्या महायुतीच्या बैठकीला आपल्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी कोणत्या ‘टोन’मध्ये महायुतीच्या बैठकीला शुभेच्छा दिल्या, यावरही सारेकाही अवलंबून आहे.
बारामतीवर जोर
पुढची लोकसभा निवडणुक बारामतीतून लढणार असल्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली. बाळापूर (Balapur) येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे जाहीर केले. परभणीत (Parbhani) आपला पराभव मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचे जानकर म्हणाले. बाळापुरातील भाषणात जानकरांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली. वडील आजारी असला की, मुलाला तिकीट दिले जाते, असे ते म्हणाले. अकोल्यात भाजपचे तत्कालीन खासदार संजय धोत्रे आजारी असलेल्या त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली. अनुप धोत्रे हे निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे जानकर यांचा रोख भाजपकडे होता, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवले.