Congress : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आणि महाराष्ट्रात भाजपकडून याच मुद्द्यावर प्रचारावर भर देण्यात येत आहे. यावरून राजकारणदेखील तापले असताना काँग्रेसकडून ‘जियो और जिने दो’चा नारा देण्यात आला आहे. आपला देश शांतीदुतांची भूमी असून येथे कुणाला मारण्यापेक्षा प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य देण्याची परंपरा राहिली आहे, अशी भूमिका मध्यप्रदेशचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी काँग्रेसच्या वतीने मांडली आहे.
नागपुरात प्रचारासाठी आल्यानंतर पटवारी यांनी काँग्रेसकडून हा नारा दिला. ते म्हणाले, ‘देशात दोन विचार सुरू आहेत. एकीकडे धोका, विश्वासघात आहे तर दुसरीकडे विश्वास आहे. या निवडणुकीत विश्वासघात हरेल आणि विश्वास जिंकणार असेच चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांमध्ये दरी वाढवली आहे. काही लोकांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आहे तर काही गरिबीमध्ये जगत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंतप्रधान मोदी हे नवा भारत म्हणतात, त्यात मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार यांची विक्री होते. रात्रीच्या अंधारात हे काम करतात.’
धोकाधडी सरकार
राज्यपालसुद्धा कधी सरळ न बोलणारे शपथविधीसाठी रात्रभर जागतात. महाराष्ट्रातील सरकार हे धोकाधडी सरकार आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. अजित पवार यांच्यासारखे आहेत, ज्यांनी आधी भाजपवर टीका केली, शिव्या दिल्या, ते आता त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले आणि त्यांच्यासोबत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली, असंही पटवारी म्हणाले.
मध्यप्रदेशच्या खोट्या गॅरंटी
मध्य प्रदेश सरकारने ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेशात लाडकी बहीणला पैसे दिले जात आहेत ते योग्यप्रकारे मिळत नाहीत. आता महाराष्ट्रात तेच सुरू केलं. लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
Jitu Patwari : गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला
खर्च करण्यात काँग्रेस टॉपवर
नागपुरात विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यासाठी उमेदवारांना एक मर्यादा देण्यात आली आहे. त्यानुसार रोज खर्चाचा हिशेब अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो. आतापर्यंत नागपूरच्या उमेदवारांकडून करण्यात आलेल्या खर्चात काँग्रेसचेच नेते आघाडीवर असल्याचे दिसत आहे. उत्तर नागपूरचे उमेदवार नितीन राऊत आणि दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव या दोघांनीही आतापर्यंत साडेबारालाखाच्या आसपास खर्च केल्याचे कागदोपत्री सिद्ध होत आहे. अर्थात नितीन राऊत यांनी पूर्ण हिशेब अद्याप सादर केलेला नाही.