Assembly Results 2024 : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला. भाजपच्या या गडातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे. त्यामुळे भाजपची मत फुटल्याने पक्षासाठी आता हा मुद्दा चिंतन आणि चिंतेचा झाला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांपैकी काहींना याबाबत घेणेदेणे नसले तरी काहींनी हा विषय धोक्याची घंटा असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी भाजपचा हा गड अभेद्य ठेवला होता. त्यामुळे आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला किंवा अन्य पक्षाला डोकं वर काढता आलं नाही. दोन उमेदवारांमुळे मतांचं विभाजन झालं हे जरी खरं असलं तरी, भाजपच्या अनेक बुथवरील मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अनेक भागातून आजपर्यंत भाजपलाच मतदान झालं. विजयनगर, तारफैल, टिळक रोड, गांधी चौक, डाबकी रोड, वानखेडे नगर, शिवाजी नगर, जोगळेकर प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, अकोली खुर्द, रिंग रोड, गोरक्षण रोड, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, खदान कॅम्प या भागातून काँग्रेसला बऱ्यापैकी मतदान झालं आहे.
पक्षात फूट?
निवडणुकीसाठी भाजपने विजय अग्रवाल यांच्या नावाची घोषणा केली. अग्रवाल यांच्या नावाची घोषणा होताच सगळ्यांची पहिली प्रतिक्रिया होती की भाजपचा पराभव झाला. त्यामुळे सुरुवातच ‘पनवती’ झाली. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणापर्यंत प्रचारामध्ये भाजपचे बरेच कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक सहभागी नव्हते. योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर अखेरचे काही दिवस अकोला पश्चिम मध्ये भाजपने प्रचारात जोर घेतला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 86 हजार बोगस मतदार असल्याची ओरड आता केली जात आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे केवळ एक तक्रार करून स्वस्थ बसणे पसंत केले.
86 हजार बोगस मतदार एखादा उमेदवार निवडून आणू शकतात किंवा पराभूतही करू शकतात. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने भाजपची दखल घेतली नाही. त्यानंतर या मुद्द्यावर भाजपने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका का दाखल केली नाही? असा प्रश्नही अनुत्तरीत आहे. भाजपच्या ज्येष्ठ आणि एकनिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अपमान भाजपला भोवला आहे. याशिवाय जनतेच्या मनाविरुद्ध जात उमेदवार देणंही भाजपला महागात पडलं आहे. इतकच नव्हे तर रिंग रोडवरील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं. हा परिसर देखील भाजपच्या मतदारांचा आहे. त्यामुळे पक्षाच्या आतूनच पक्षविरोधी काम झालं हे दिसत आहे.
Eknath Shinde : जेव्हा शिंदे गावी जातात, तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात !
‘फुल टू रिपेरिंग’ गरजेची
पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून भाजप आता अनेकांविरुद्ध कारवाई करणार आहे. त्यामुळे किती लोकांवर कारवाई करणार असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते नेत्यांना विचारू लागले आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरून अकोला जिल्ह्यातील भाजपची ‘फुल टू रिपेरिंग’ केली जाणे नित्तांत गरजेचे आहे. विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. शहराचा विकास गरजेचा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणे महत्त्वाचे आहे. रस्ते सुसज्ज होणे आवश्यक आहे. एलईडी पथदिवे शहरातील अंधार दूर करतील. मोर्णा नदीची स्वच्छता गरजेची आहे. मालमत्ता कर नियंत्रणात ठेवावा लागणार आहे. बंद पडलेला अंडरपास आणि उड्डाणपूल सुरळीत ठेवण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय रोड पासून थेट किल्ला चौकात निघणारा पूल वाहतुकीच्या दृष्टीने गरजेचा झाला आहे. आतापर्यंत जे झाले नाही ते होणे गरजेचे आहे. अकोल्याला स्थानिक पालकमंत्री ही तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी भाजपकडून रणधीर सावरकर यांना संधी मिळावी, अशी मागणी होत आहे. अकोला पश्चिम आणि बाळापूर हे दोन मतदारसंघ वगळले तर उर्वरित ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे अकोल्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला तर असे 56 साजिद खान आहे काही करू शकणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार असेल. केंद्रातही भाजपचेच बहुमताचे सरकार आहे. त्यानंतरही जर साजिद खान पठाण यांच्या हात मजबूत होत असतील, तर मतदारांनी नव्हे भाजपने भविष्याची चिंता आणि चिंतन करणे गरजेचे झाले आहे.
रसद पुरवणे बंद व्हावे
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई महाराष्ट्रात सुरू केली. यावेळी त्यांनी सगळ्यात पहिले आक्रमण करणाऱ्या मोगलांची रसद बंद केली. जोपर्यंत रसद बंद होत नाही तोपर्यंत असे अनेक अफजल खान उभे राहतील, हे शिवाजी महाराजांना ठाऊक होते. त्यामुळे आता तरी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी अशा स्थानांना रसद पुरवणे बंद करणे गरजेचे आहे. अन्यथा अकोला जिल्ह्यात भाजपचे ‘कमळ’ चिमून काँग्रेसचा ‘पंजा’ केव्हा मजबूत होईल हे कोणालाही कळणार नाही. यासाठी आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ आणि एकनिष्ठ लोकांनी दबाव तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे.