Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून विरोध सुरू आहे. आरक्षणाच्या या आंदोलनात आता राजकीय नेतेही उतरले आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली आहे. गुरुवारी (दि.२५ जुलै) या यात्रेला प्रारंभ होईल. यात्रेसाठी शरद पवार, छगन भुजबळ यांच्या सह अनेक राजकीय नेत्यांना त्यांनी निमंत्रण दिले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे आंबेडकरांचं नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. आघाडी, युती आणि जागावाटप यावर चर्चांची खलबते सध्या सुरू आहेत. असे असतानाच राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन असेल किंवा ओबीसी नेत्यांचे आंदोलन असेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाचा मुद्दा आपल्या हाती घेतला आहे. 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली आहे. या यात्रेचे अनेक राजकीय नेत्यांना आंबेडकर यांनी निमंत्रण दिले आहे.
निमंत्रण स्वीकारतील का?
राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं आहे. निमंत्रण स्वीकारुन हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सध्या सुरू असून, जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे आंबेडकर म्हणाले.
चैत्यभूमीवरून यात्रेला प्रारंभ
आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैला मुंबईतील चैत्यभूमी येथून सुरू होणार आहे. त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा राज्याचा प्रवास करेल. यात्रेची सांगता औरंगाबाद येथे होईल.
यात्रेचे उद्दिष्ट्य
ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे
Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे
ओबीसींना SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती तशी लागू व्हावी
SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे
100 ओबीसी आमदार निवडून आणणे
55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे