महाराष्ट्र

PM Modi in Chandrapur : हे दारूच्या धंद्यातून कमावलेल्या पैशांतून भरलेले डिपॉझीट नाही, मुनगंटीवार कडाडले !

Narendra Modi and Sudhir Mungantiwar : खोटं बोलण्यात काँग्रेसवाल्यांचा हात कुणीही पकडू शकत नाही.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आज (ता. 8) चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मुनगंटीवार विरोधकांच्या टीकेवर चांगलेच संतापले. काँग्रेस नेत्याच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुनगंटीवार म्हणाले, मला काँग्रेसच्या एका नेत्याची कीव येते. कारण तो म्हणाला होता की, मुनगंटीवारांचे डिपॉझीट जप्त करू. त्यांना माहिती नाही. की लोकांनी आपल्या घामाचा एक-एक रुपया देऊन हे डिपॉझीट भरले आहे. हे दारू दुकानांतून कमावलेल्या पैशांचे डिपॉझीट नाही. की ते कुणीही येईल आणि जप्त करेल. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे जनता होता है, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्ला चढवला आणि कुणाचेही नाव न घेता प्रतिस्पर्धी उमेदवाराला टोला हाणला.

Narendra Modi in Chandrapur : काँग्रेसवाल्यांची नार्को टेस्ट करा, तेही म्हणतील, पंतप्रधान तर मोदीच

..तर राहुल गांधी पहिले विजेता !

खोटं बोलण्यात काँग्रेसवाल्यांचा हात कुणीही पकडू शकत नाही. ऑलंम्पिकमध्ये स्पर्धा ठेवली, तर त्याचा पहिला विजेता राहुल गांधीच असणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मायावी प्रचार केला जात आहे. त्यांचे त्यांचे फलक जास्त आहे, पण त्याहीपेक्षा महायुतीचे कार्यकर्ते जास्त आहेत. रेवंत रेड्डीचा सोशल मिडिया आणला. तो येथे आणल्यापेक्षा अमेठित न्या. भाजपची प्रचाराची गाडी अडवून सोशल मिडियावर टाकत असाल तर तुमचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला.

सांगायला काम नसते, तेव्हा जात आठवते..

जातीविरहित व्यवस्थेसाठी आम्ही काम केले आहे. जाती बेटी व्यवहारासाठी असतात. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जात नसते. डॉक्टर जातीचा नाही म्हणून कुणी उपचार घेण्याचे टाळत नाही. जेव्हा विकास सांगता येत नाही, तेव्हा जात आठवते. अयोध्येच्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातून काष्ठ पाठवले. मी वचन देतो, तर संसदेमध्ये या वाघाच्या भूमीचा आवाज पूर्ण देश ऐकेल. मी कधीच जातीचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.

तुमच्याही कुटुंबात खासदार, आमदार होते. त्यांच्या एका नेत्याला मी विचारले की तुम्ही केलेले विकास काम सांग, त्यांनी मेंदूला ताण दिला, पण त्याला आठवले नाही. संविधान भाजप बदलेल, असे त्यांच्या प्रचार फलकावर लिहिले आहे. काँग्रेसवाल्यांना बुद्धी देताना कमी का दिली, असा प्रश्न मी ईश्वराला नेहमी विचारतो. त्यांचाच जाहीरनामा वाचला तर वरती लिहिलं आहे की, भाजपवाले संविधान बदलतील आणि खाली लिहितात की आम्ही सत्तेत आल्यास संविधानात बदल करू. हे डॉ.. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. याला कुणी माईचा लाल बदलवू शकत नाही.

१९५४ मध्ये तुम्ही बाबासाहेबांचा पराभव केला. त्याचा बदला आम्ही घेऊ. पंडित नेहरूंनी स्वतः प्रस्ताव केला आणि स्वतःलाच भारतरत्न दिले. रामदास आठवलेंचे सामान घराच्या बाहेर फेकले होते. एका व्यक्तीला यमराज घ्यायला आला आणि म्हणाला अंतिम इच्छा काय आहे, ते सांग. तो म्हणाला की, राहुल गांधींना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यावर यमराज म्हणाला की, तुला अमर व्हायचे आहे का? हा किस्सा त्यांनी सांगितला. ज्याप्रमाणे आई मुलाचं नुकसान होऊ देत नाही, त्याचप्रमाणे मोदी देशाचं नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!