Mumbai South Central : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे.मुंबईत तीन मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना, दोन ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप; तर एका मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत रंगली आहे. दक्षिण मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्याविरुद्ध शिंदे शिवसेनेच्या यामिनी जाधव अशी लढत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशा दोन्ही शिवसेना उमेदवारांत लढत आहे.
विजय आमचा…
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी सकाळीच मतदान केले. विजयाचा विश्वास व्यक्त केला. मी 100 टक्के हॅटट्रिक करणार, असे ते म्हणाले. या क्षणी वंदनीय बाळासाहेबांची आठवण येते, असे ते म्हणाले. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे, निकाल येऊ द्या त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल, असे मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
मध्य मुंबई या मतदारसंघात अनिल देसाई यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर जनतेचा कौल डावलून उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो चुकीचा होता हे मतदार मतदानातून दाखवून देतील असा विश्वास महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला. राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब मतदान केले. राहुल शेवाळे म्हणाले, देशाचं भवितव्य कुणाच्या नेतृत्वात सुरक्षित राहील हे पाहून जनतेने मतदान करावे.
दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदान केले. मी खासदार होणारच, अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी दिली.
Mumbai Election : मतदानासाठी धावाधाव अन् ‘लाईफ लाईन’ गेली कोमात
कोणाच्या डोक्यावर विजयाची टोपी ..
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मागील दहा वर्षांपासून येथे शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार आहेत. त्यांनी 2014 साली आता शिंदे गटात आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. तर 2019 साली देखील अरविंद सावंत हे मोठ्या मतांनी विजयी झाले होते. आता येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळणार आहे. कोणाच्या डोक्यावर विजयाची टोपी बसेल हे पाहणे औत्सुक्याचे राहील.