महाराष्ट्र

Lok Sabha Election : रामटेकमध्ये भाजप हट्टाला पेटली; कार्यकर्ते मात्र नाखुश

Raju Parve : शिवसेनेचा दावा कायम असेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही

Ramtek Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काहीसा घोळ रामटेक मतदारसंघात घालून ठेवला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून उमेदवार आयात केला जात असल्याच्या चर्चेने सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिल्यास प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. रामटेकच्या उमेदवारीवरून सध्या महायुतीत प्रचंड तणातणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना रामटेक मतदारसंघ सोडायला तयार नाही. भाजपला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे घ्यायचा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना अद्यापही रामटेकच्या गडाचा किल्लेदार कोण? असा प्रश्न कायम आहे.

शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघात सलग दोनदा विजय मिळाविला. आता तुमाने एकनाथ शिंदे यांच्यासेाबत आहेत. मात्र भाजपचा तुमाने यांच्या नावाला विरोध आहे. भाजपच्या अनेक इच्छुकांनी रामटेकमध्ये प्रचारही सुरू केला आहे. उमरेडमधील काँग्रेसचे आमदार राजू पारवे भाजपात येणार आणि रामटेकमधून लढणार अशी चर्चा दोन महिन्यांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांन आमदार पारवे भेटले. मात्र शिवसेना जोपर्यंत या मतदारसंघावरचा हक्क सोडत नाही, तोपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, अशी अट पारवे यांनी आहे.

शिवसेना सध्या कामही मतदारसंघांबाबत अडून बसली आहे. रामटेकही त्यापैकी एक आहे. रामटेकमध्ये उमेदवार बदलवा अशी सूचना शिवसेनेला करण्यात आली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सोडायचा नसेल तर राजू पारवे यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपने दिला आहे. मात्र यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचीच सर्वाधिक घुसमट होत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको आहे. असे झाल्यास राजीनामा देण्याची तयारी अनेकांनी केली आहे. भाजपकडून गावागावांमध्ये बैठक घेण्यात येत आहे. समजाविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनेतही नाराजी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहेत. अमोल गुजर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा पाठविला आहे. गुजर यांनी आणखी 150 पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे सांगितले. रामटेकमधून निवडणूक लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे रामटेकचा तिढा सध्या सुटता सुटेनासा झाला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!