Political News : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील लढाई ही व्यक्तिगत नाही. ही लढाई विकासाची आहे. राष्ट्रहिताची आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यंग चंदा ब्रिगेडच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चंदा ब्रिगेडचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
समाजातील प्रत्येक घटकाला विकास हवा आहे. हा विकास केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. पाचशे वर्षानंतर राम मंदिराचे अपुरे स्वप्न पूर्ण झाले आहे. यंदाचा रामनवमी उत्सव आयोजित मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. हा चंद्रपूर साठी अभिमानाचा क्षण आहे. त्याचे कारण म्हणजे श्रीराम मंदिरासाठी वापरण्यात आलेले लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. असाच अभिमान लोकसभेबाबतही वाटतो. संसदेच्या नव्या इमारतीत वापरण्यात आलेले लाकूडही चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
चौफेर प्रगती केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची चौफेर प्रगती केली. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीच्या फायद्याची नाही. ही देश हिताची आहे. गेल्या दहा वर्षात भारताने प्रचंड प्रगती केली आहे. अशीच प्रगती साधायची असेल तर नरेंद्र मोदी या नावाशिवाय पर्याय नाही. नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे असेल तर त्यांचे ‘अबकी बार चारसो पार’ हे स्वप्न साकार करावी लागेल. त्यासाठी आपल्यालाही विजयी करावी लागेल असे आवाहन सुधीर गुनगंटीवार यांनी केले.
दुष्ट विचार मिटावे
रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामाला प्रार्थना करतो. काही जण देश तोडायला निघाले आहे. असे दुष्ट विचार मिटवण्याची शक्ती प्रभू श्रीरामाने द्यावी. देशात सध्या वैचारिक यज्ञ सुरू आहे. या यज्ञामध्ये दुष्ट आणि कपटबुद्धीची आहुती देण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी विजयी झाल्यास हा यज्ञ सफल होईल असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यंग चंदा ब्रिगेडचा प्रत्येक हा वैचारिक महा यज्ञ सफल करेल असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.