Political News : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रचारात अव्वल ठरण्यासाठी दंड थोपाटले आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांची झोप उडाली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या प्रचारात मिळेल तिथे नाश्ता व उपलब्ध होईल तिथे जेवणाचे दोन घास घेतले जात आहेत. अशावेळी तहान भूक विसरून गावे पालथी घालण्यावर उमेदवारांचा भर आहे. उमेदवार प्रचारातून मध्यरात्री उशिरा घरी परत येत आहेत. त्यामुळे त्यांना केवळ तीन ते साडेतीन तासांची झोप मिळत आहे.
भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक विविध कारणांमुळे लक्षवेधी ठरत आहे. या मतदारसंघाचा विस्तार सुमारे 250 किलोमीटर पर्यंत आहे. दुर्गम, अतिदुर्गम गावे यात आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांची सीमा, घनदाट वनक्षेत्र आहे. मात्र पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. आता प्रचाराच्या अंतिम चरणात सकाळी सहा पासून भाजपचे उमेदवार खासदार सुनील मेंढे व महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
जोमाने प्रचार
बसपा सह ‘वंचित’च्या उमेदवारांनीही प्रचारात कुठलीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. मेंढे व पडोळे यांचा मतदारसंघात प्रचार सुसाट वेगाने सुरू आहे. (Political Campaign got Speed In Vidarbha) दोन्ही उमेदवार दररोज 25 ते 30 गावे पिंजून काढत आहेत. 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर 30 मार्चपासून दोघांनीही मतदारसंघातील 12 तालुक्यांत प्रचाराचा धडाका सुरू केला. उमेदवार आता प्रचारात व्यस्त आहेत. बैठकांचे सत्रही रंगत आहे.
जिथे व्यवस्था तिथे पोटपुजा
प्रचाराहून कितीही उशिरा आले, तरी मेंढे हे सकाळी साडेपाच वाजता जागे होतात. ते नियमित व्यायाम करतात. परंतु सध्या त्यांचा व्यायाम बंद आहे. चहा घेतल्यानंतर ते लगेच प्रचाराला निघत आहेत. पडोळे हे देखील सकाळी पाच जागे होतात. शक्य तितक्या लवकर ते प्रचारासाठी घराबाहेर पडतात. पूर्वीप्रमाणे योगा-प्राणायाम, नाश्ता, जेवण, झोप यात तारतम्य राहिलेले नाही. मिळेल तिथे पोटपूजा करून वेळ वाया न घालवता ठरविलेल्या गावात प्रचार करूनच दम घेतात.
Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया लोकसभेत उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
चहा, शितपेयांवर भर
उन्हाचा तडाखा जास्त असल्याने अधूनमधून चहा-कॉफी किंवा शितपेय उमेदवार व त्यांचे समर्थक घेतात. डॉ. पडोळे यांची अनेक प्रचारसभा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासोबत असल्याने जिथे व्यवस्था होईल तिथे जेवणाची सोय केली जाते. सुनील मेंढे व डॉ. प्रशांत पडोळे घरून निघताना आपापल्या पक्षाचा दुपट्टा गळ्यात हमखासपणे घेतातच. दोन्ही उमेदवारांना त्यांच्या ‘होम मिनिस्टर’कडूनही प्रचारात चांगलीच साथ मिळत आहे. या सर्व घडामोडीत तीन तासाचीच झोप घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची कसरत सध्या दोन्ही उमेदवारांची सुरू आहे.